राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

हा तर ‘वैचारिक’ साक्षात्कार…!

आर्य चाणक्यांनी रयतेचा राज्यकारभार करताना राजाने किंबहुना लोकशाही राष्ट्रातील राज्यकर्त्यांनी जनतेशी कसा संवाद साधावा, याबाबतची महत्त्वाची सूत्रे सांगून ठेवली आहेत. ही चाणक्यनीतीबरहुकूम पाळणे जगातल्या राज्यकर्त्यांना मानणारे किंवा मानवणारे नसतील तरीही जनतेच्या कल्याणासाठी, जनतेवर आपल्या विचारांचा प्रभाव पाडण्यासाठी चाणक्यनीतीत जी काही महत्त्वाची जनता संवादसूत्रे सांगितलेली आहेत, त्याचे अनुकरण जगातल्या राज्यकर्त्यांनी थोड्याफार प्रमाणात आचरणात आणली तर जागतिक सौख्य आणि सर्वसामान्य रयतेच्या मनात त्या राज्यकर्त्यांबद्दल एक दृढविश्वास निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. सामाजिक सौख्य, आर्थिक उत्पन्नाच्याबाबतीत, कृषिविषयक आखण्यात येणारी ध्येय-धोरणे या सर्वांवर या सूत्रांचे विचारमंथन एक प्रभावी साधन ठरणारे आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या ही सूत्रे जागतिकस्तरावर वापरली गेली, तर हे विश्व एक वेगळी समाधानी वृत्तीची झालर पांघरून बसेल, हे नाकारता येणार नाही.

रविवारी (दि. २४) मुंबईच्या षण्मुखानंद हॉलमध्ये देशाचे पंतप्रधान श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांना पहिला ज्येष्ठ गायिका (स्व.) लता दीनानाथ मंगेशकर हा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्काराच्यानिमित्ताने आपल्या मनातल्या भावना भाषणाद्वारे व्यक्त करताना श्री. मोदी यांनी जे वैचारिक मंथन केले ते मंथन, भाषण नरेंद्र मोदी यांच्या वैचारिक सिद्धीला हिमालयाच्या उंचीचा मापदंड देणारे ठरले. उच्चपदस्थ किंवा एखाद्या राष्ट्रप्रमुखाच्या अंगात नम्रता, विनयशीलता किती आणि कशी असावी, याबद्दलचे परिमाण या भाषणाने श्री. नरेंद्र मोदी यांच्या विश्ववैभवाला साजेसे ठरणारे होते. ५० वर्षांच्या पत्रकारितेत कुणावर आरत्या ओवाळण्याचे पापकर्म या लेखणीतून कधीच घडले नाही.

उलट एखादे वास्तव जगासमोर मांडून रयतेच्या मनात आपल्या राष्ट्रप्रमुखाबाबत वैचारिक स्पंदनाचा प्रादुर्भाव व्हावा, याच उद्देशाने आणि प्रामाणिक भावनेने या संपादकीयचा प्रपंच केला आहे. उच्चपदस्थात विनम्रता तथा विनयशीलता, पुरुषार्थ आणि सत्यवचनाचा अशी चारित्र्यसंपन्नतेची दूरदृष्टी मग ती आर्थिक असो किंवा न्यायिक असो, असल्याशिवाय अशा अभूतपूर्व विचारांचे दान रयतेसमोर येऊच शकणार नाही, हेच वास्तव पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांच्या रविवारी केलेल्या भाषणातून एखाद्या साक्षातप्रद अनुभूतीसारखे वाटते. नम्रता हा राज्यकर्त्यांचा पुरुषार्थ असतो, याचे भान देऊन श्री. नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणतात, ‘लतादीदी या देशाच्या पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर दिशांना परिचित तर होत्याच होत्या, पण त्याहीपेक्षा त्यांच्या संगीतसाधनेने भारतीयांच्या अंतःकरणाला जो भावस्पर्श केला, त्यामुळे लतादीदी संपूर्ण भारतवासीयांच्या होत्या. म्हणून हा पुरस्कार भारतीय जनतेला समर्पित करतो.’ राज्यकर्त्यांच्या अंत:करणात नम्रतेची जी ऊर्जा प्रज्वलित होत असते ती ऊर्जा रेल्वे स्टेशनवर आपल्या तीर्थरूपांच्यासोबत प्रवाशांना चहाचा कप हातात देताना ज्या श्री. मोदी यांनी जपली तो प्रवास (नम्रतेचा) देशाच्या सर्वोच्च पदावर विराजमान असेतोपर्यंत कायम ठेवला. ही स्वाभिमानाने आणि जनतेच्या दृष्टीने एक अभिमानाची बाब मानावी लागेल.

श्री. नरेंद्र मोदी कोणत्या पक्षाचे आहेत, कोणत्या गटाचे आहेत, कोणत्या भागाचे आहेत, याच्याशी काहीही देणे-घेणे नाही. तो पक्ष, ती विचारधारा जरुर त्यांची त्यांना लखलाभ असू दे, पण वैचारिक स्पंदनाचे गारुड आणि विनम्रतेची गाठलेली परिसीमा नरेंद्र मोदी नव्हे, तर या देशाच्या, हिंदुस्तानच्या वैचारिक प्रगल्भतेचे अधिष्ठान मानावे लागेल. आजपर्यंतच्या देशातल्या झालेल्या पंतप्रधानांपैकी आरुढ झालेल्या व्यक्तींमध्ये (कै.) राष्ट्रपती राधाकृष्णन, (कै.) अटलबिहारी वाजपेयी आणि तिसरी व्यक्ती म्हणजे श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी. झालेले संस्कार एखाद्या उच्चपदस्थ व्यक्तीच्या आत्म्याचे स्वर बनतात, त्या संस्कारांचे दर्शनही श्री. मोदी यांच्या या भाषणातून दिसून आले. आपल्या भाषणात त्यांनी आद्य शंकराचार्यांनी मांडलेल्या अद्वैत सिद्धांताचे जे अप्रतिम विश्लेषण केले त्या विश्लेषणाचा धागा त्यांनी (स्व.) लता मंगेशकर यांच्या स्वरसंपत्तीपर्यंत नेऊन पोहोचवला.

तो विलक्षण तर होताच होता, संस्कारी जीवनाची आधारशिला असलेली ऊर्जा जनमानसावर किती प्रभाव टाकू शकते, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अद्वैत सिद्धांत तथा वेदांतशास्त्राचे केलेले हे विश्लेषण होय. त्यांनी आपल्या भाषणात लतादीदींशी कौटुंबिक आणि भावनिक नाते जोडताना ‘त्या माझ्या भगिनी होत्या,’ हा केलेला उल्लेख लतादीदींच्या स्वरसाधनेला श्री. मोदी यांनी दिलेली भावनिक साद होती. श्री. मोदी यांनी मंगेशकर घराण्याविषयी आपल्या भाषणात जे सूचक वक्तव्य केले तेसुद्धा अनेकांच्या भावनेला स्पर्श करून गेले. मोदी म्हणतात, ‘निमंत्रण आले तेव्हा कार्यक्रमाचा विचार केला नाही, वेळेचा विचार केला नाही, एका क्षणात निमंत्रणाचा स्वीकार केला. कारण मंगेशकर कुटुंबीयांवर माझा हक्क आहे. देशाच्या पंतप्रधानांची ही भावना किती उज्ज्वल होती, याचे हे प्रमाण आहे.

लतादीदींबाबत बोलताना भारताच्या लतादीदी म्हणून जग त्यांच्या स्वरांकडे आकृष्ट झाले. त्यामुळे लतादीदी विश्वात भारताची ओळख झाल्या. येथे राष्ट्र ही संकल्पना कशी सार्थपणे मांडली, याचे हे एक देदीप्यमान उदाहरण आहे. श्री. नरेंद्र मोदी यांनी आपल्या संपूर्ण भाषणात गुणांचे वैभव किती प्रभावी असू शकते, याचे वैचारिक मंथन करून एका शब्दानेही राजकीय अस्मितेला स्पर्श केला नाही. राजकारणाचा तंबू, जातीयवादाची भडकलेली ज्वाला आणि भ्रष्टाचाराने समृद्ध झालेले राजकारणी या विषयाला सुईच्या टोकाएवढा कुठेही स्पर्श केला नाही. उदात्त विचार, पवित्र आचार आणि प्रखर राष्ट्रनिष्ठा यांचा त्रिवेणी संगम श्री. नरेंद्र दामोदरदास मोदी यांच्या भाषणात दिसला, इतके हृदयस्पर्शी भाषण मोदीजींच्या अंत:करणात ‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास’ या त्रिसूत्रीचा हे भाषण एक साक्षात्कार होते, हे नाकारता येणार नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये