समृद्धी महामार्गाच्या कामात दुर्घटनांचा पाढा सुरूच; सिंधखेडराजा तालुक्यात निर्माणाधीन पुलाचा काही भाग कोसळला

मुंबई आणि नागपूर ही दोन मुख्य शहरे जोडणारा समृद्धी महामार्ग हा मराठवाडा – विदर्भाला जोडणारा वेगवान पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देणारा महामार्ग म्हणून बघितला जात आहे. महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा पायाभूत सुविधा प्रकल्प या दृष्टीने या महामार्गाकडे बघितलं जात आहे.
समृद्धी महामार्गातील नागपूर ते शेलू बाजार, वाशिम अशा २१० किमी लांबीच्या मार्गाचे उद्घाटन २ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार होतं. मात्र नागपूर जवळ पहिल्या टप्प्यात वन्यजीवांसाठी बांधण्यात येत असलेल्या एका उन्नत मार्गाला कामादरम्यान तडे गेल्याचं लक्षात आल्यानं जवळपास दोन महीने या टप्प्याचे उद्घाटन लांबणीवर पडलं आहे.
महामार्गाच्या पहिल्या टप्प्यातील पुढच्या भागात बुलढाणा जिल्ह्यात असून अजून एक दुर्घटना घडली आहे. सिंदखेडराजा तालुक्यात दोन डोंगराळ भागाला जोडणाऱ्या निर्माणाधीन उड्डाणपुलाचा काही भाग कोसळला आहे. यावेळी त्या ठिकाणी काम करणारे कामगार जेवायला गेले असल्यामुळे ते थो़डक्यात बचावले, जीवीतहानी झाली नाही. पूलाचा भाग एका ट्रेलरवर कोसळल्याने ट्रेलरचे नुकसान झाले आहे.
महामार्गाच्या निर्मितीचे काम युद्धपातळीवर सुरु असलं तरी अडथळ्यांचा पाढा सुरूच आहे त्यामुळे काम लांबणीवर पडत आहे.