‘एखाद्याला पीएचडी करायची असेल तर…’; संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

मुंबई : सध्या उत्तर प्रदेशमध्ये हजारो धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले असून ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. या निर्णयावरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी योगी सरकारचं अभिनंदन करताना महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. याच टीकेसंदर्भात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईमध्ये पत्रकारांशी चर्चा करताना या टीकेसंदर्भात त्यांनी भाष्य केलं आहे.
राज ठाकरे यांनी उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत असणाऱ्या योगी सरकारवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. मात्र यावेळी त्यांनी महाराष्ट्रामध्ये सत्तेत असणाऱ्या ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. योगी सरकारच्या या निर्णयावर सोशल मीडियावरुन व्यक्त होताना राज यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये राज यांनी, “उत्तर प्रदेशमधील धार्मिक स्थळांवरील, विशेषत: मशिदींवरील भोंगे उतरवल्याबद्दल योगी सरकारचे मन:पूर्वक अभिनंदन आणि आभार,” असं म्हटलंय. पुढे बोलताना त्यांनी ठाकरे सरकावर निशाणा साधला आहे. “आमच्याकडे महाराष्ट्रात ‘योगी’ कुणीच नाही, आहेत ते फक्त सत्तेचे ‘भोगी’! महाराष्ट्र सरकारला सद्बुद्धी मिळो, हीच आई जगदंबेचरणी प्रार्थना,” असंही त्यांनी म्हटलं आहे.
यावर आता संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “आता योगी कोण आणि भोगी कोण यासंदर्भात मतपरिवर्तन कसे झाले, हा एक संशोधनाचा विषय आहे. एखाद्याला पीएचडी करायची असेल तर त्याने करावी,” असं राऊत यांनी राज ठाकरेंना टोला लगावताना म्हटलं आहे.