‘…तर पंजाबप्रमाणेच राजस्थानही काँग्रेसच्या हातून जाईल’- सचिन पायलट

नवी दिल्ली : काँग्रेसचे राजस्थानमधील नेते आणि माजी मुख्यमंत्री सचिन पायटल यांनी दोन वर्षांपूर्वी राजस्थानमधील नेतृत्वाबद्दल नाराजी व्यक्त करत केलेली बंंडखोरी सर्वश्रुत आहेच. मात्र, त्यानंतर त्यांचा राग निवळला आणि ते पक्षातच राहिले. पण यादरम्यान सचिन पायलट यांची पक्षानं राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदावरून उचलबांगडी केली. शिवाय राज्याच्या अध्यक्षपदावरून देखील त्यांना पायउतार व्हावं लागलं. यानंतर आता पुन्हा एकदा सचिन पायलट यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे. यासंदर्भातलं एनडीटीव्हीनं वृत्त दिलं आहे.
वृत्तानुसार, सचिन पायलट यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. आपल्याला तातडीने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी नेमण्यात यावं, अशी मागणी सचिन पायलट यांनी केली आहे. राजस्थानमध्ये पुढील वर्षी अर्थात २०२३मध्ये निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांमध्ये पक्षाला चांगली कामगिरी करायची असेल, तर आपल्याला तातडीने राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी नियुक्त करावं, असं पायलट यांनी म्हटलं आहे.
“मला राजस्थानच्या मुख्यमंत्रीपदी बसून २०२३मध्ये पक्षाची सत्ता पुन्हा एकदा राज्यात आणण्यासाठी काम करायचं आहे. जर काँग्रेसनं योग्य निर्णय घेण्यासाठी उशीर केला, तर पंजाबप्रमाणेच राजस्थान देखील काँग्रेसच्या हातून जाईल”, असं देखील सचिन पायलट यांनी सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांची भेट घेऊन सांगितल्याचं म्हटलं जात आहे.