नेटफ्लिक्सच्या पीछेहाटीच्यानिमित्ताने…

ताज्या ‘प्राईस वॉर’ला युद्ध, महागाई, स्पर्धा कारणीभूत असली तरी २०२२ च्या पहिल्या तिमाहीत सदस्यसंख्या कमी झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे निकाल अपेक्षेप्रमाणे नव्हते. याचा अर्थ नेटफ्लिक्स के यहाँ से अच्छे दिन गुजर गये. सर्व भागांतून अकरा महिन्यांमध्ये त्यांचे आठ लाख सबस्क्रायबर्स गेले. त्याचा सर्वात मोठा फटका भारतात बसला.
युद्धाच्या झळा, महागाई, वाढती स्पर्धा या सगळ्यांमुळे नेटफ्लिक्सची प्रेक्षकसंख्या कमी होत असताना मराठी गाण्यांचे आणि नाटकाचे कार्यक्रम लोकप्रिय होताहेत. ‘मी वसंतराव’ जोरदार चालू असताना नेटफ्लिक्सवरील गर्दी कमी होणे बोलके आहे. त्या त्या मातीचा एक सुगंध-गुणधर्म असतो. तिथे त्या त्या जातीचेच झाड वाढू शकते. मनोरंजनक्षेत्रातला अल्लाउद्दीनचा दिवा आता नेटफ्लिक्सच्या हातात आहे का, हा खरा सवाल आहे.
नेटफ्लिक्स भारतात लाँच झाले ते वर्षं होते २०१६. दरम्यानच्या काळात भारताच्या घराघरांमध्ये नेटफ्लिक्स पोहोचले आणि किंबहुना ओटीटी प्लॅटफॉर्ममधला सर्वात मोठा मार्केट शेअर जर कोणी मिळवला असेल तर तो या नेटफ्लिक्सने. परंतु युक्रेनचे युद्ध, महागाई, स्पर्धा आणि कोविडनंतर डामाडौल झालेली जगाची अर्थव्यवस्था या सगळ्यामुळे नेटफ्लिक्सलादेखील फटका बसलाय. गेल्या काही महिन्यांमध्ये त्यांची प्रेक्षकसंख्या फक्त भारतामध्ये तब्बल दोन लाखांच्या घरात कमी झाली आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये पहिल्यांदाच असे घडतेय, की भारतामध्ये त्यांची प्रेक्षकसंख्या इतक्या झपाट्याने खाली जात आहे. खरे तर या काळामध्ये प्रेक्षकसंख्या २५ लाखांनी वाढेल, असा एक अंदाज त्यांनी वर्तवला होता. परंतु प्रत्यक्षात त्यांची प्रेक्षकसंख्या कमी झाली आहे आणि ती त्यांच्यासाठी फार मोठी चिंतेची बाब आहे. या सगळ्यामुळे त्यांच्या शेअरची किंमत काही दिवसांमध्ये तब्बल २६ टक्क्यांनी खाली घसरली. त्यामुळे गुंतवणूकदारांचे तब्बल ४० बिलियन डॉलर इतके प्रचंड नुकसान झाले. हे कागदोपत्री झालेले नुकसान असले तरी नेटफ्लिक्सला फार मोठा धक्का बसला आहे, यात काही शंकाच नाही. इतर मनोरंजक ओटीटी प्लॅटफॉर्म्सवरही याचा परिणाम झाला आहे. उदा. वॉल्ट डिस्ने किंवा वॉर्नर ब्रदर्स. अलिकडच्या काळात वॉल्ट डिस्नेचा शेअर पाच टक्क्यांनी व वॉर्नर ब्रदर्सचा जवळपास साडेतीन चार टक्क्यांनी खाली गेला.
रशिया-युक्रेन युद्धामुळे रशियामध्ये प्रक्षेपण थांबवल्यामुळे सात लाख यूजर्स कमी झाले, त्याचा फटका या वाहिन्यांना बसला. काही महिन्यांपूर्वी कोविडकाळात आपल्याला सर्वात जवळचा आधार होता, तो याच ओटीटी प्लॅटफॉर्मवरच्या माध्यमांचा. मग नेटफ्लिक्सवर दिसणारे चित्रपट असतील किंवा सिरीज असतील. या सगळ्यांनीच आपले भावविश्व आणि करमणूकविश्व व्यापून टाकले होते. अनेक जण या वेब सिरीजचे दिवाने झाले होते. अगदी आपल्याकडच्या घरातल्या टीव्हीलाही या नेटफ्लिक्सने गिळंकृत करून टाकले होते. पण बघता बघता या नेटफ्लिक्सला यू-ट्यूब आणि अॅमेझॉनची तीव्र स्पर्धा निर्माण झाली. पण जाहिरातीचा सपोर्ट घ्यायचा नाही, कोणत्याही परिस्थितीत आपण निखळ मनोरंजन द्यायचे ही भूमिका आजवर ‘नेटफ्लिक्स’ने जपली. पण आता मात्र इतर ओटीटी प्लॅटफॉर्म्सनी आपापले दर धडाधड कमी केले. त्याला जाहिरातीचा सपोर्ट दिला. किंमत कमी ठेवली. त्यामुळे त्यांची प्रेक्षकसंख्या प्रचंड वाढली आणि मग तिथे एक तीव्र स्पर्धा निर्माण झाली. यू-ट्यूब आणि अॅमेझॉनवर असणार्या जाहिराती मग काही प्रमाणात नेटफ्लिक्समध्येही दिसायला लागल्या. मग नेटफ्लिक्सने सुरुवात केली ती मॉनिटायझेशनची. म्हणजे ग्राहकांकडूनच पैसे मिळवायचे. अधिकाधिक पैसे मिळवायचे नेमके मार्ग शोधायचा प्रयत्न केला तेव्हा आपला रेव्हेन्यू आणि प्रेक्षकसंख्या कमी का होतेय, हे त्यांच्या लक्षात आले. नेटफ्लिक्सने देऊ केलेल्या अकाऊंट शेअर करायच्या सुविधेमुळे एक मोठा घोळ झाल्याचे त्यांना जाणवले.
दरम्यान, परिस्थिती सावरण्यासाठी नेटफ्लिक्सने आपले सदस्यत्व शुल्क १९९ रुपयांवरून घटवून १४९ रुपयांवर आणले. लक्षात घ्या, काही महिन्यांपूर्वी आपण नेटफ्लिक्सच्या सदस्यत्वासाठी १९९ रुपयांऐवजी ४९९ रुपये देत होतो किंवा त्याच्याबरोबरच्या स्टँडर्ड पॅकेजसाठी ४९९ रुपयांऐवजी ६४९ रुपये देत होतो. आज जगभरातल्या घराघरांमध्ये नेटफ्लिक्स आणि त्यांची करमणूक पोहोचली आहे. ‘नेटफ्लिक्स की दुनिया’ अशा नावाची वेगळी कम्युनिटी निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांनी प्रिमियम प्लॅनचीही किंमत घटवली. प्रिमियम, स्टँडर्ड, नॉर्मल या श्रेणींमध्ये विभागलेल्या प्लॅन्सची किंमत त्यांनी १८ ते ६० टक्के किंमत घटवली. नेटफ्लिक्सची किंमत घटली त्याच दिवशी त्याचे तीव्र प्रतिस्पर्धी असलेल्या अॅमेझॉनने आपल्या सदस्यत्वाचे मूल्य ९९९ रुपयांवरून १४९९ रुपयांवर नेले. इथेच अॅमेझॉनची स्पर्धा किती तीव्र आहे, हे आपल्या लक्षात आले असेल. त्याचबरोबर डिस्ने आणि हॉटस्टार यांच्या किमतीदेखील नेटफ्लिक्सपेक्षा जास्त आहेत. परंतु तरीदेखील नेटफ्लिक्सचे वर्चस्व वादातीत होते. यात आणखी एक ठसठशीतपणा होता तो ‘सोनी’ या ओटीटी प्लॅटफॉर्मचा. त्यांचा कंटेंट उत्तम असून त्याचे वर्गीकरणही चोख करण्यात आले आहे. भारतामध्ये झी आहे, व्हूट आहे, बालाजी आहे, इतर अनेक जण आहेत. परंतु आज तरी ते ‘आल्सो रन’ किंवा ‘मार्जिनल प्लेअर’ आहेत.
ताज्या ‘प्राईस वॉर’ला युद्ध, महागाई, स्पर्धा कारणीभूत असली तरी २०२२ च्या पहिल्या तिमाहीत सदस्यसंख्या कमी झाल्याची नोंद घेण्यात आली. त्यामुळे निकाल अपेक्षेप्रमाणे नव्हते. याचा अर्थ नेटफ्लिक्स के यहाँ से अच्छे दिन गुजर गये. अहो, सर्व भागांतून अकरा महिन्यांमध्ये त्यांचे आठ लाख सबस्क्रायबर्स गेले. त्याचा सर्वात मोठा फटका भारतात बसला. परिणामी, नेटफ्लिक्सच्या अधिकार्यांनी हातपाय मारायला सुरुवात केली आणि चिली, कोस्टारिका, पेरू या देशांमध्ये आपल्या सदस्यत्वाच्या नियमांमध्ये बदल केले. ते यशस्वी ठरले. म्हणजे आधी तुमचे अकाऊंट शेअर करून कोणीही नेटफ्लिक्स बघू शकत होते, त्याऐवजी त्यांनी रेव्हेन्यू मिळवण्यासाठी ‘अॅड सबस्क्रायबर्स’ असा प्रयोग यशस्वी करून दाखवला. म्हणजेच एकट्या यूएसए आणि कॅनडामधून तब्बल सहा लाख ४० हजार सबस्क्रायबर्स कमी झाले असले तरी या छोट्या-छोट्या देशांतून त्यांनी आपली प्रेक्षकसंख्या टिकवायचा नव्हे, तर वाढवायचा प्रयत्न केला आणि या प्लॅटफॉर्मचे आकर्षण तसेच ठेवण्यासाठी त्यांनी नेटफ्लिक्सच्या माध्यमातून विविध प्रकारचे गेम्स ऑफर करायला सुरुवात केली.
नेटफ्लिक्स पाहायला सुरुवात केली तेव्हाच वेब सिरीजमधून सातत्याने दिसणारा व्हायोलन्स, सेक्स याचा कधी तरी कंटाळा येईल, याचा अंदाज आला. मात्र आज आपल्याला या माईंडलेस सादरीकरणाचा कंटाळा आलाय, असे वाटत नाही. बॉलिवूडसुद्धा त्याची कॉपी करायला लागलेय. म्हणजे आज दिसणारी नेटफ्लिक्सची परिस्थिती उद्या बॉलिवूडलाही पाहावी लागणार नाही कशावरून? म्हणजे एकीकडे मराठीत अनेक चांगले चित्रपट पाहायला मिळताहेत. उत्तम ऐतिहासिक चित्रपटही येताहेत. त्यात काही चांगली मूल्ये आहेत, ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वे आहेत, कालौघात टिकलेली व्यक्तिमत्वे आहेत. त्यांचे चित्रपट लोकप्रिय होत आहेत आणि इकडे प्रचंड खर्च करून निर्माण केलेल्या ‘नेटफ्लिक्स’वरच्या सिरीजही कोसळत आहेत. त्यांची प्रेक्षकसंख्या कमी होतेय. हे सगळे गणित समजून घेण्यासाठी सर्वात महत्त्वाची आहे त्या त्या भागातली, प्रदेशातली नेमकी अस्मिता. तिथल्या लोकांची टेस्ट काय आहे, लोकांना काय आवडते याची अचूक जाण असणे महत्त्वाचे आहे. म्हणजे लोकांना एकाच वेळी चित्रपट पाहायचा किंवा टेलिव्हिजन पाहायचा किंवा गेम्स खेळायचा ऑप्शन असतो. म्हणजे या सगळ्यावर मात करून तुमचे नेटफ्लिक्स लोकांना आवडावे, असे वाटत असेल तर लोकांना आवडतील, असे बदल सातत्याने करीत राहणे, ते लोकल असणे आणि त्यांचा दर्जा ग्लोबल असणे महत्त्वाचे असते. म्हणजेच एक प्रकारे हा सगळा खेळ लोकल ग्लोबलचा आहे. म्हणजेच ‘मेक कंटेन्ट लोकल अँड सेल इट ग्लोबल…’
अलिकडच्या काळात नेटफ्लिक्सवर ‘द क्राऊन’ नावाची सिरीयल चर्चेत होती… इंग्लंडच्या राणीवरची. मी अनेक वेळा बघितली. तुम्हाला खरेच सांगतो, इंग्लंडमध्ये बनवलेली ही सिरीयल भारतीयांमध्ये लोकप्रिय व्हायचे कारण त्याची गुणवत्ता, सकसता आणि टिकवलेला दर्जा. म्हणजेच तुम्ही चांगले दिले तर लोक नक्की बघतात. परंतु आज युद्धाच्या झळा, महागाई, वाढती स्पर्धा या सगळ्यांमुळे नेटफ्लिक्सची प्रेक्षकसंख्या कमी होतेय एवढे मात्र निश्चित. हे एकीकडे तर दुसरीकडे मराठी नाटकांचे कार्यक्रम चर्चेत येताहेत. मग ती राहुल देशपांडेंची असो वा संजीव अभ्यंकरांची; त्यांच्या लाईव्ह कॉन्सर्टची गर्दी वाढत चालली आहे. गाण्याचे आणि नाटकाचे कार्यक्रम लोकप्रिय होताहेत. म्हणजे एकीकडे ‘मी वसंतराव’ जोरदार चालू आहे आणि नेटफ्लिक्सवरील गर्दी कमी होतेय हे कशाचे बरे लक्षण आहे? हे लक्षण एकाच गोष्टीचे आहे आणि ते म्हणजे त्या त्या मातीचा एक सुगंध असतो, एक गुणधर्म असतो. तिथे त्या त्या जातीचेच झाड वाढू शकते. तुम्हाला त्या झाडाचे बी गवसले तर तुमच्या हातात तिथला अल्लाउद्दीनचा दिवा आलेला असतो. तो दिवा आता नेटफ्लिकसच्या हातात आहे का, हा खरा सवाल आहे. गेम तोच आहे. मेक लोकल, सेल ग्लोबल…