एकीकडे दुष्काळ; दुसरीकडे सुकाळ अशी परिस्थिती
चाकण : खेडच्या भामा-आसखेड धरणातील पाणी विसर्ग बंद करण्यात आला. सध्या धरणात ३९.५१ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती धरण प्रकल्पाचे उपविभागीय अधिकारी तुळशीदास आंधळे यांनी दिली.
खेड तालुका ते दौंड तालुक्यातील आलेगावपागापर्यंतचे असलेले भीमा व भामा नदीवरील बंधारे भरून शेतकर्यांच्या पिकांसह गावच्या पाणी योजनांना पाणी मिळावे म्हणून धरण प्रशासनाकडून उन्हाळी दुसरे आवर्तन ५ एप्रिल २०२२ रोजी धरणाचे आयसीपीओ गेटमधून १ हजार क्यूसेकने पाणी सोडले होते. सलग ३० दिवस धरणाचे आयसीपीओमधून पाणी सोडल्यानंतर शुक्रवारी पाणी बंद केले. तब्बल १ महिना पाणी धरणातून प्रथमच सोडले गेलेले आहे. धरणातून सोडलेल्या पाण्याचा फायदा खेड, शिरूर, हवेली, दौंड या तालुक्यांना होणार आहे. जिल्हा पाणी कालवा समितीने ठरविलेल्या आवर्तनानुसार धरणातून पाणी सोडण्यात आल्याचे धरण प्रशासनाने सांगितले.
खडकवासला साखळी प्रकल्पातही पाण्याची टंचाई
खडकवासला साखळी प्रकल्पातील चार धरणांमध्ये सध्या ९.७४ अब्ज घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीपेक्षा हा पाणीसाठा तब्बल दोन टीएमसीने कमी झाला आहे. शहराला टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला या चार धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. चारही धरणांमध्ये मिळून एकूण ९.७४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी ५ मेपर्यंत हा पाणीसाठा ३८ टक्क्यांपेक्षा जास्त होता. उन्हाळी हंगामासाठी ११ मार्चपासून सुरू करण्यात आलेले आवर्तन १० मेपर्यंत सुरू राहणार आहे. या कालावधीत सहा टीएमसी पाणी जाणार आहे.
१० जूनपर्यंत दुसरे उन्हाळी आवर्तन सुरू केले जाणार आहे.
भीमा-भामा नदीकाठीलगत जमिनी व जलसिंचन योजना असलेल्या शेतकर्यांना बंधार्यातील पाणी उपसा करून उन्हाळी शेती पिकांना फायदा होणार आहे. धरणाच्या पूर्व भागाच्या शेतकर्यांना पाण्याचा फायदा झाला. तर धरण जलाशयातील पाणी आटल्याने पश्चिम भागातील शेतकरी व नागरिकांना पाणी समस्यांना तोंड द्यावे लागत असून पाणीटंचाई सुरू झाली आहे. एकीकडे दुष्काळ, तर दुसरीकडे सुकाळ अशी स्थिती पाहायला मिळत आहे.
शनिवारी धरणातील पाण्याची पातळी ६६०.८६ मिलिमीटर आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ९९.३०० दलघमी असून उपयुक्त पाणीसाठा ८५.७७८ दलघमी आहे.