देशातील सर्वात वेगवान ट्रेन सेवेसाठी सज्ज

नवी दिल्ली : सध्या देशामध्ये केंद्र सरकारच्या अनेक योजनेच्या माध्यमातून दळणवळणाचे जाळे अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्याचे विस्तारीकरण करून त्याचा व्यापार, उद्योग आणि नागरिकांना कसा फायदा मिळू शकेल, या दृष्टीने विकासाचे काम सुरू आहे. रेल्वे, रस्ते, जलवाहतूक, हवाईवाहतूक या सर्वांचेच जाळे विस्तारीकरण चालू आहे. त्यातच देशातील सर्वात जलद रेल्वे आता लवकरच प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. दिल्ली ते मेरठपर्यंत रेल्वेचे काम वेगाने सुरू असून, हे स्वप्न २०२४ पर्यंत पूर्ण करण्याची तयारी पूर्ण झाली आहे. त्याचा पहिला टप्पा २०२३ पर्यंत सुरू होईल, अशी अपेक्षा आहे. भारतातील पहिल्या आरआरटीएस कॉरिडॉरचा पहिला ट्रेनसेट पूर्ण झाला आहे आणि ७ मे २०२२ रोजी भारत सरकारच्या गृहनिर्माण मंत्रालयातील सचिवांच्या उपस्थितीत आयोजित कार्यक्रमात एनसीआरटीसीकडे सुपूर्द करण्यात आला.
‘मेक इन इंडिया’ उपक्रमांतर्गत या अत्याधुनिक आरआरटीएस ट्रेनसेट गुजरातमधील सावली येथील अल्स्टॉमच्या कारखान्यात तयार केल्या जात आहेत. ही रेल्वे १८० किमी वेगाने धावणार असून ही देशातील पहिली फास्ट रेल्वे असणार आहे. या रेल्वेत मोठ्या सुरक्षा काच असून प्रवासी या काचाच्या खिडक्यांसह बाहेरील दृश्यसुद्धा बघता येणार आहेत. या ट्रेन्समध्ये व्हिज्युअल आणि ऑडिओ अनाऊन्सर असणार, ज्याद्वारे प्रवाशांना पुढील स्टॉप, ट्रेनचा वेग सोबत वर्तमान लोकेशन कळणार आहे.
रेल्वेची वैशिष्ट्ये
या रेल्वेमध्ये प्रत्येक आसनावर वायफाय, लॅपटॉप आणि मोबाईल चार्जिंगचीदेखील सुविधा देण्यात आली आहे. सीसीटीव्ही कॅमेरे, सोबतच डायनॅमिक मॅप, ऑटो कंट्रोल अॅम्बियंट लायटिंग सिस्टीम बसविण्यात येणार आहे. व्हेंटिलेशन आणि एअरकंडिशनिंग सिस्टीम, तसेच व्हीलचेअर आणि सहज प्रवेशासाठी ट्रेनच्या दरवाजाजवळ स्ट्रेचर यांसारखी वैशिष्ठ्ये आहेत.