‘उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता…’- नीलम गोऱ्हे

मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी भाजपावर हल्लाबोल केला आहे. न्यायालयाचा भोंग्याच्या बाबतीत स्पष्ट निर्देश असतानाही राज ठाकरेंकडून भोंग्यांच्या विषयाच्या निमित्ताने स्वतःच्या पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा टोला लगावून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्याने भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. या राजकिय वैफल्यातून त्यांनी जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू केले आहे. शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न होत असल्याची टीका नीलम गोऱ्हे यांनी केली आहे. निलम गोऱ्हे यांनी शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘भाजप सरकारसोबत युतीत असताना आम्हाला दोन- तीन गोष्टी खटकत होत्या. छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकांचा विषय असेल या प्रत्येक ठिकाणी डावलणे व अपमानित केले जात होते. २०१४ च्या निवडणुकीत विकासाचा अजेंडा सांगताना फर कॅप घालून मोदींसाहेबांचे फोटो भाजपच्या नेत्यांसोबत दिसत होते. तेथे ही शिवसेनेला डावलले गेले. त्यानंतर एकनाथ खडसेंनी युतीचा पोपट मेला आहे, असं सांगितले.
“विधानसभेवेळी युती करताना आमची तर १५५ आमदारांची तयारी चालल्याचं भाजपचे नेते सांगत होते. मुळात दोघांचे आमदार निवडून आणण्यासाठी प्रयत्न व्हायला हवे होते. मात्र, त्याऐवळी शिवसेनेला संपविण्यासाठी भाजपकडून सातत्याने प्रयत्न चालू होते. लोकांत दिशाभूल करत राहायची. आता हनुमान चालिसाचा विषय काढला असून, ज्यांची श्रद्धा आहे तो कोठेही प्रार्थना करू शकतो. केंद्र सरकारची लाऊड स्पिकरबाबत बंधने आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार निर्णय होतो. अशावेळी चालिसा म्हणणे व भोंग्यांच्या विषयाच्या निमित्ताने स्वतःच्या पक्षाला संजीवनी देण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत आहेत. ’’ असंही त्या म्हणाल्या.