पुणे रेल्वे स्टेशन : जिलेटीनच्या कांड्या नसून वापरलेल्या फटाक्याच्या नळ्या
पुणे : सकाळी पाउणेअकराच्या दरम्यान पोलिसांना पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनतर या बातमीची दखल घेत पुणे पोलिस, रेल्वे पोलीस, जीआरपीएफ, आरपीएफ, अग्निशामक दल स्थानकावर दाखल झाले. त्यांनी तत्काळ रेल्वे स्थानक मोकळे करून रेल्वे स्थानकावर येणाऱ्या रेल्वे गाड्या देखील थांबवण्यात आल्या होत्या. त्यानंतर स्फोटकांचा स्वरूपातील असल्याने ती वस्तू निकामी करण्यासाठी बॉम्ब शोधक व बॉम्बनाशक (बिडीडीएस) पथकाने बी जे वाद्यकीय महाविद्यालयाच्या मैदानात नेली होती.
संपूर्ण तपासणी केली असता, पुणे लोहमार्ग पोलीस अधीक्षक सदानंद वायसे यांनी अधिकृत माहिती दिली आहे. ते म्हणाले की, पुणे रेल्वे स्थानकावर बॉम्बसदृश्य वस्तू किंवा जिलेटीनच्या कांड्या सापडल्याचे वृत्त पूर्णपणे चुकीचे आहे. त्या जिलेटीनच्या कांड्या नसून फटाक्यांच्या रिकाम्या पुंग्या आहेत.त्यात थोड्याबहुत प्रमाणात फटाक्यांचे काही प्रमाणात स्फोटके होती ती बी. जे. मेडिकल कॉलेजमार्फत नष्ट करण्यात आली आहेत. तरी नागरिकांनी कुठल्याही अफवांना घाबरु नका. असे आवाहन त्यांनी लोकांना केले आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी देखील हाच खुलासा काहीवेळापूर्वी केला होता.