केतकी चितळेच्या ‘त्या’ पोस्टवर राज ठाकरेचं ‘ठाकरे शैलीत’ प्रतिउत्तर
केतकी चितळे या टीव्ही अभिनेत्रीने राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर आक्षापार्ह शब्दात टीका केल्यानंतर अनेक स्तरातून तिच्यावर टीका केली जात आहे. या प्रकरणावर आता थेट मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रतिकिया देत त्यांनी पोस्टचा निषेध व्यक्त केला आहे. याबाबत मनसेकडून एक पत्रक जारी करण्यात आलं आहे. यामध्ये त्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर असल्याचे म्हटले आहे.
केतकी चितळे ची पोस्ट काय आहे?
केतकीने केलेल्या पोस्टमध्ये तिने आक्षेपार्ह लिखाण केलं आहे. त्यामध्ये “ऐंशी झाले आता उरक, वाट पाहतोय नरक” असे आक्षेपार्ह शब्द वापरल्याने राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमक बहुमूक घेतली आहे. यानंतर या पोस्टवर अनेक स्तरातून प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे.
नेमकं काय आहे पत्रात ?
कोणीतरी केतकी चितळे नामक व्यक्तीने अतिशय खालच्या पातळीवर जाऊन घाणेरड्या शब्दात काहीतरी श्लोकासारखं लिहून फेसबुकवर पोस्ट प्रकाशित केलेली आमच्या निदर्शनास आणली गेली. खाली काहीतरी भावे वगैरे असं नाव टाकलं आहे. हे जे लिखाण आहे त्याला महाराष्ट्र संस्कृतीत जागा नाही. त्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो.
महाराष्ट्राच्या राजकारणात बरीच वर्ष कार्यरत असलेल्या शरद पवारांविरूध्द तिनं किंवा त्या भावेनं हे लिहिणं साफ गैर आहे. विचारांचा मुकाबला विचारांनी करायचा असतो. एखादा हलका विनोद वगैरे आपण समजू शकतो, त्यातली विनोदबुध्दीही आपण ओळखतो.. तशा टीका महाराष्ट्राला नव्या नाहीत…! आमचे त्यांच्याबरोबर मतभेद जरूर आहेत आणि रहातील, परंतु अशा घाणेरड्या पातळीवर येणं साफ चूक आहे, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही हे इथे फार स्पष्टपणे सांगणं गरजेचं आहे. असं लिहिणं ही एक प्रवृत्ती नव्हे तर मानसिक विकृती आहे, तिला वेळीच आवर घालायला पाहिजे. चांगल्याला चांगलं आणि वाईटाला वाईट म्हणणं हेच आजपर्यंत आपल्या महाराष्ट्रातल्या महापुरूषांनी, संतांनी तसेच असंख्य बुद्धीमान विचारवंतानी आपल्याला शिकवलं! कोणीही ह्या राज्याची परंपरा खालच्या पातळीवर नेऊ नये हीच अपेक्षा!
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्ती ह्या खरंच आहेत की नवा वाद उकरून काढण्यासाठी कोणाची तरी उठाठेव सुरू आहे हे देखील तपासणे गरजेचे आहे! कारण ह्या अशाच चार-दोन विकृत टाळक्यांमुळे समाजा समाजामध्ये तेढ निर्माण होते, समाज दुभंगतो. द्वेषाची पातळी किती खालपर्यंत आली आहे हे आता राज्यकर्त्यांनाही समजलं असेलच. हे सगळं महाराष्ट्रात वेळीच आवरणं गरजेचं आहे कारण महाराष्ट्राची ओळख वेगळी आहे. म्हणूनच, राज्यसरकारनं ह्याचा नीट छडा लावून ह्या गोष्टींचा ताबडतोब बंदोबस्त करावा.