मुंबई : सध्या धर्मवीर या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. शिवसेनेचे लोकप्रिय नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील हा चित्रपट पाहिला. पण चित्रपटाचा शेवट पाहणे त्यांनी टाळले. याचे कारण देखील त्यांनी सांगितले होते ते म्हणाले, मी चित्रपटाचा शेवट पाहू शकलो नाही. आनंद दिघे यांच्या अपघातानंतर मी व्यतिथ झालेले बाळासाहेब पहिले आहेत. आनंद दिघे यांचा मृत्यू शिवसैनिकांवर आघात होता. पण आता यासंदर्भात भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्वीट शेअर केले आहे.
दरम्यान, चित्रपटाच्या शेवटच्या सीनमध्ये राज ठाकरे आणि राणे साहेबांची प्रतिमा उजळवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे त्यांनी शेवट पाहिला नाही. यावरुन हे देखील कळते की, शिवसेनेच्या उभारणीत उद्धव ठाकरे हे नव्हते. सत्य नेहमीच बोचरे असते. चित्रपटात शेवटच्या १० मिनिटांत आनंद दिघे यांच्या जीपला झालेला अपघाताचा प्रसंग दाखवण्यात आला आहे. अपघातानंतर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आलेले आनंद दिघे, त्यांची सिंघनिया रुग्णालयात विचारपूस करण्यासाठी आलेले राज ठाकरे आणि नारायण राणे तसंच आनंद दिघे यांच्या मृत्यूनंतर सिंघनिया रुग्णालयात एकत्र धाव घेतलेले राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे असे काही प्रसंग चित्रपटाच्या शेवटी दाखवण्यात आले आहेत.