…म्हणून राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित

मुंबई/अयोध्या :राज ठाकरेंनी आज सकाळीच अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करत असल्याची घोषणा केली आहे. मनसे समर्थकांकडून यासाठी राज ठाकरेंच्या आजारपणाचं कारण दिलं जात आहे. राज ठाकरेंच्या पायाचं दुखणं बळावलं असून पुण्यातल्या सभेनंतर त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अयोध्या दौऱ्याच्या स्थगितीचं अधिकृत कारण समोर आलेलं नसलं, तरी याबद्दलचा खुलासा २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत करण्यात येणार आहे.
दरम्यान, राज ठाकरेंचा बहुचर्चित अयोध्या दौरा स्थगित झाल्याचं समोर आलं आहे. त्यानंतर आता त्यांच्यावर टीकेची झोड उठण्यास सुरूवात झाली आहे. दौरा स्थगित कशाला करायचा? आम्ही मदत केली असती, असा खोचक टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी लगावला. त्यानंतर भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माफी न मागणाऱ्या राज ठाकरेंनी जुन्या जखमा ताज्या केल्या आहेत. त्यांच्याकडे एक संधी होती, तीही हुकली. त्यांनी इथल्या लोकांची, योगींची, मोदींची माफी मागितली असती तर उत्तर प्रदेशच्या लोकांचा राग कमी झाला असता. पण माफी न मागता त्यांनी जखम पुन्हा ताजी केली आहे.