
काहीही चूक नसताना ‘एचआयव्ही पॉझिटिव्ह बालके’ म्हणून जेव्हा समाजात निष्पाप बालके जन्माला येतात तेव्हा या मुलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलतो. त्यांच्या आयुष्यात अंधःकारमय जीवनच येतं. या अंधःकारमय जीवनाला प्रकाशाच्या भविष्याकडे घेऊन जाण्याचे काम पुणे येथील ‘ममता’ फाउंडेशनच्या शिल्पा बुडूख-भोसले गेली कित्येक वर्षे आपले कर्तव्य म्हणून बजावत आहेत.
‘ममता फाउंडेशन’ ही संस्था नसून ज्यांची कोणतीही चूक नसताना एच.आय.व्ही./एड्स सारख्या आजाराला बळी पडलेल्या निरागस मुला-मुलींचे हक्काचे घर आहे. या मुलांकडे समाजाच्या दृष्टीकोन वेगळा असतो. परंतु या सर्व मुलांना खर्या अर्थाने ममता फाऊंडेशनच्या माध्यमातून अनाथांची सावली ; शिल्पा त्यांची माऊली म्हटले तर वावगे ठरणार नाही.

३५ जणांचा हा ‘ममता परिवार’ पुण्यातील कात्रज भागात गुजर निंबाळकर वाडी येथे आनंदाने व गुण्यागोविंदाने राहतो आणि या मुलांची आई आहे सौ. शिल्पा अमर बुडूख-भोसले. ममता परिवाराची सुरुवात ही २००७ साली एका छोट्याशा घरात चार मुलांपासून झाली. संस्थेची स्थापना सौ. शिल्पा व त्यांचे यजमान अमर यांनी केली. त्यावेळी १२ वर्षांपूर्वी लावलेले हे छोटेसे रोपटे आता वटवृक्ष झाले आहे.
कोणत्याही शासकीय अनुदानाशिवाय समाजातील दानशूर व्यक्तींच्या मदतीतून संस्थेचे कार्य १२ वर्षे झाले अविरतपणे सुरू आहे. संस्थेमार्फत मुलांना अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांव्यतिरिक्त सकस, पौष्टिक आहार, वैद्यकीय सेवा, शिक्षण व पुनर्वसन या सर्व सुविधा पुरवल्या जातात. संस्थेचे वातावरण हे पूर्णपणे कौटुंबिक आहे. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्याला हा आजार आहे व आपलं कोणी नाही, याची पुसटशीही जाणीव या लेकरांना होऊ नये.

संस्थेमध्ये (ममता परिवारात) सर्व सण-समारंभ मोठ्या आनंदाने, उत्साहाने साजरे केले जातात. दिवाळीत फटाके, गोडधोड, मिठाई असो किंवा होळीला पुरणपोळीचा आस्वाद, रंगपंचमीला रंगांची उधळण, रक्षाबंधनाला बहीणभावाचे नाते जोडणे किंवा
थोरा-मोठ्यांची जयंती हे सर्व धूमधडाक्यात साजरे होतात. मुलांच्या छोट्या-छोट्या आनंदाचा विचार केला जातो.
वर्षातून दोन-तीन वेळा सहली काढल्या जातात. यात समुद्रकिनार्यावर आनंद घेतला जातोे. अनेक गडकिल्ले पाहिले आहेत. मल्टिफ्लेक्सवर अनेक सिनेमे पाहिले आहेत. एवढेच काय तर विमान प्रवासदेखील अनुभवला आहे. प्रत्येक मुला-मुलींचा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. मोठी मुले-मुली विविध कोर्ससाठी बाहेर जातात. दोन मुली फॅशन डिझाइनिंग शिकतात. कोणी अकाउंटिंग शिकते, तर कोणी ऑफिस काम शिकते, तर कोणी आवडीने स्वयंपाकही शिकते. दोन मुले बाहेर नोकरीला जातात. संस्थेतील मुलांना बाहेर ये-जा करायला गाडी चालवतात. तीन मुलींची लग्नं झालीत.

मुलांसाठी मेडिटेशन, योगा यांचे शिबिर आयोजित केली जातात. विविध अॅक्टिविटी घेतल्या जातात. त्याचप्रमाणे समाजातील वेगवेगळ्या विषयांवर संवाद साधण्यासाठी, माहिती देण्यासाठी त्या-त्या विषयांतील तज्ज्ञ येऊन मुलांसोबत संवाद साधतात. संस्थेला कोणतीही शासकीय मदत नाही, परंतु समाजातील असंख्य मदतीचे हात मुलांसाठी पुढे येतात. कोणी आपला वाढदिवस साजरा करताना मुला-बाळांचा, मित्रपरिवाराचा, कुटुंबीयांचा वाढदिवस येथील मुलांसोबत साजरा करतात.
प्रसंग दु:खाचा असो किंवा आनंदाचा, तो क्षण या मुलांसोबत साजरा करून सढळ हाताने गरज ओळखून मदत करतात. मग ती मदत वस्तू स्वरूपात असते. अन्नधान्य स्वरूपात असते. कपडे, खाऊ, फळ व त्याचप्रमाणे रोख रक्कम व चेक स्वरूपात लोक मदत करतात. संस्थेला भेट देण्यासाठी सर्व स्तरातून हात पुढे येतात. यात अनेक सिनेकलाकार आहेत. राजकारणातील व्यक्ती आहेत, पोलिस अधिकारी आहेत. अनेक सामाजिक मंडळे, सोसायटी, विविध ग्रुप संस्थेमध्ये येऊन गरजेप्रमाणे मदत करतात.
सध्या शिल्पा बुडूख-भोसले या तब्बल ३५ मुला-मुलींची आई आहेत. अनाथ, एचआयव्ही, एड्सबाधित मुलांचा सांभाळ त्या आनंदाने करतात. त्यातील तीन मुलांचे विवाह झाले असून, सध्या त्या आजीची भूमिकाही निभावत आहेत. मुलांचे संगोपन करताना त्यांच्या प्रत्येक गरजेकडे लक्ष देणार्या ‘ममता फाउंडेशन’च्या संस्थापिका शिल्पा बुडूख-भोसले यांचे व्यक्तिमत्त्व प्रेरणादायी आहे.
रस्त्यावर राहणारी मुले, देहविक्रय करणार्या महिलांच्या मुलांसाठी एमएसडब्ल्यूची पदवी प्राप्त केलेल्या शिल्पा बुडूख व त्यांचे पती अमर बुडूख काम करायचे. हे काम करताना ज्यांना आई-वडील नाहीत, नातेवाइकांनी सांभाळ करण्यास नकार दिला आहे, अशा अनाथ व एचआयव्ही झालेल्या मुलांचा सांभाळ कोण करणार, हा प्रश्न दोघांना पडला आणि याच प्रश्नातून ‘ममता फाउंडेशन’चा जन्म झाला. २००८ मध्ये या संस्थेची स्थापना गुजर निंबाळकरवाडी येथे करण्यात आली. शिल्पा बुडूख सांगतात, ‘अनाथाश्रमे खूप आहेत, पण एचआयव्ही बाधित मुलांसाठी काहीच नव्हते. या आजाराबाबत आजही समाजात अनेक गैरसमज आहेत.
अशा मुलांना खरी मायेची गरज आहे, हे ओळखूनच संस्था सुरू केली. माझ्या दोन मुलींप्रमाणेच ही ३५ मुलेही माझीच आहेत. आपण समाजापासून दूर आहोत, आपल्याला कुटुंब नाही, ही भावना त्यांच्या मनात कधीच येत नाही. कारण ‘ममता’ ही संस्था नाही, तर एक घर, कुटुंब आहे. त्यादृष्टीने सगळे सणसमारंभ, वाढदिवसापासून सगळे कार्यक्रम आम्ही एकत्र करतो. मुलांना गडकिल्ले, समुद्रकिनारे, पर्यटनस्थळांवर फिरायला नेतो. ते त्यांचे आयुष्य आनंदात जगताहेत.
मी महेश. वय वर्षे २३. खूप लहान असताना आलो होतो. मला माझे आई-वडील आठवत नाहीत. मला आई-वडिलांचे प्रेम ताई आणि सरांनी दिले. मला आतापर्यंत कधीच वाटले नाही की, मला एचआयव्ही झाला आहे. मलाच काय ममता परिवारात कुणालाच याची जाणीव होत नाही. आज मी माझ्या पायावर उभा राहिलो आहे. चौकात जे बोर्ड दिसतात i love katraj असे ते बोर्ड बनवण्याचे काम मी करतो.
_महेश (‘ममता’तील एक मुलगा)
‘संस्थेमध्ये चार वर्षांपासून ते २० वर्षांपर्यंतची मुले आहेत. या मुलांना पौष्टिक आहार, नियमित वैद्यकीय उपचार, विविध तपासण्या, खेळ, व्यायामापासून ते त्यांच्या शाळा-महाविद्यालयीन शिक्षणापर्यंतच्या सगळ्या गोष्टींकडे लक्ष दिले जाते. मुलांचा सांभाळ करीत असताना ही मुले कधी मोठी झाली हे लक्षातही आले नसल्याची भावना शिल्पा यांनी व्यक्त केली. यातील काही मुले ही नोकरीही करीत आहेत. आजी झाल्यानंतर मुलीचे आणि बाळाचे सर्वांनी कौतुकही केले. तिच्यासाठी बाळंतपणात लागणार्या सर्व गोष्टी करण्याची मजा काही वेगळीच भावना देऊन गेली, असेही त्या म्हणाल्या.
समाजाकडून मिळणार्या देणगीवर त्यांची मुले-मुली मोठी होत आहेत, शिक्षण घेत आहेत. आपण किती जगणार आहोत, हे आपल्यालाही माहीत नसते. या मुलांच्या आयुष्याबाबतचे प्रश्न सोडवणे महत्त्वाचे आहे. या मुलांना आम्ही मानसिकदृष्ठ्या खंबीर बनविले आहे. ‘ममता फाउंडेशन’ ही संस्था नसून ज्यांची कोणतीही चूक नसताना एच.आय.व्ही./ एड्स सारख्या आजाराला बळी पडलेल्या निरागस मुला-मुलींचे हक्काचे घर आहे. ४० जणांचा हा ‘ममता परिवार’ पुण्यातील कात्रज भागात गुजर
निंबाळकरवाडी येथे आनंदाने, गुण्यागोविंदाने राहतो आणि या मुलांची आई आहे सौ. शिल्पा अमर बुडूख-भोसले.
संस्थेला अन्न, धान्य स्वरुपात मदत होत असते. कपडे, खाऊ, फळ व त्याचप्रमाणे रोख रक्कम व चेक स्वरुपात लोक मदत करतात. संस्थेला भेट देण्यासाठी सर्व स्तरातुन हात पुढे येतात. यात अनेक सिनेकलाकार आहेत. राजकारणातील व्यक्ती आहेत, पोलिस अधिकारी आहेत. अनेक सामाजिक मंडळे, सोसायटी, विविध गृप संस्थेमध्ये येवुन गरजेप्रमाणे मदत करतात. भारताच्या माजी राष्ट्रपती मा. प्रतिभाताई पाटील यांनी त्यांचा वाढदिवस ममता परिवारात मुलांसोबत २०१८ मध्ये साजरा केला.
मुलांसोबत मनसोक्त संवाद साधला व जाताना ममता परिवाराला मानवतेचे मंदीर ही उपमा दिली व जाताना स्वत:च्या पर्समधुन आम्हा नवराबायकोला खाऊसाठी आशिर्वादरुपी रु. ५००/- भेट दिली. हा माझा आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार मिळाला असे मला वाटते. या सर्व परिवाराची जबाबदारी व या मोठ्या संसाराचा गाडा चालवणे अजिबात सोपे नव्हते असंख्य संकटांना सामोरे जावे लागले पण म्हणतात ना की तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील व जिद्द असेल तर अनेक परमेश्वररुपी माणसं मदत करण्यासाठी पुढे येतात.
समाजातील अनेक दानी लोक मदतीसाठी येतात. परंतु अशिही काही व्यक्ती आहेत ज्यांनी या परिवाराची कायमची जबाबदारी घेण्याचे ठरवले आहे. तरी या ममता फाऊंडेशनला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.