पुणेसिटी अपडेट्स

कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणसाचेही हेलावले मन

पुणे ः वारकरी संप्रदायातील महामंत्रापाठोपाठ संतश्रेष्ठ तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज यांच्या रचनांसह देवा तुझ्या लेकराला लोटू नको दूर अशी आळवणी कानी पडताच कर्तव्यनिष्ठ पोलिसांमधील माणसाचेही मन हेलावून गेले. निमित्त होते ते शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित बंदिजनांच्या अभंग व भजन स्पर्धेचे! शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि संस्थेच्या रौप्यमहोत्सवानिमित्त राज्यातील कारागृहात असलेल्या बंदिजनांसाठी जगद्गुरू श्रीसंत तुकाराम महाराज राज्यस्तरीय अभंग व भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक व्यक्तीत सुप्त गुण असतात. शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांमध्येही ते दिसून आले आहेत. अशा व्यक्तींना स्पर्धेच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. हातून छोटी जरी चूक झाली असली तरी अशा व्यक्तीला शिक्षा भोगावी लागते; पश्चात्तपाची वेळ येते. कारागृहाच्या चार भिंतींमधून बाहेर पडण्यासाठी व्यक्तिगत सुधारणा हाच मार्ग आहे.
राणी भोसले, अधीक्षक, येरवडा कारागृह

पुण्यातील येरवडा कारागृहात (२१ मे) ही स्पर्धा झाली. कारागृहातील शिक्षक अंगद गव्हाणे, सुभेदार प्रकाश सातपुते यांनी स्पर्धेच्या संयोजनात सहकार्य केले. स्पर्धेतील सहभागाबद्दल येरवडा कारागृहातील संघास दिना धारिवाल व प्रकाश धारिवाल यांच्या वतीने स्व. कमलाबाई धारिवाल यांच्या स्मरणार्थ हार्मोनियम, तबला, पखवाज, १० जोडी टाळ, तुकोबांच्या अभंगाची पाच फूट बाय पाच फूट आकाराची फ्रेम व प्रबोधनात्मक, तसेच प्रेरणादायी ८२ पुस्तकांचा संच भेट देण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया म्हणाले, जन्माला येताना कुणीही गुन्हेगार नसतो. अध्यात्माच्या प्रबोधनातून बंदिवानांच्या जीवनाला आधार मिळावा हा स्पर्धा आयोजनामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये