पुणेसिटी अपडेट्स

केंद्राच्या धोरणामुळे शेतकरी उद्ध्वस्त

श्रीरामपूर : केंद्राच्या आयात-निर्यात धोरणांमुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. जीवनाची लढाई मागे पडली आहे. जाती-धर्माच्या लढाया मोठ्या झाल्या आहेत, अशी घणाघाती टीका राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज येथे केली. श्रीरामपूरला न्यायालयीन कामकाजासाठी आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी अभिजीत पोटे, आप्पासाहेब ढूस, विवेक माटा, बाळासाहेब पटारे, अहमद जहागीरदार, लकी सेठी आदी उपस्थित होते.

शेतमालाला हमीभाव देता येत नसेल तर, ‘पेरणी ते कापणी योजना’ रोजगार हमी योजनेला जोडण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजनात याची तरतूद करण्यात येणार असल्याचे सांगून कांद्याच्या भावासंदर्भात ते म्हणाले, कांदा खरेदीसंदर्भात केंद्राची भूमिका गुलदस्त्यात आहे. तूर, सोयाबीन खरेदीसाठी ज्याप्रमाणे फेडरेशन समोर येते, त्या धर्तीवर नाफेडने कांदा खरेदीसाठी स्वतःहून पुढाकार घेतला तर चांगले परिणाम दिसतील. तेल आयात केल्यामुळे सोयाबीनचे भाव कमी झाले. देशात तुरीचे ४८ लाख क्विंटल उत्पादन झाले.

४६ लाख टन देशाला लागते, असे असताना १० लाख टन तूर आयात करून कोणाचे पोट भरायचे होते, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. कच्चे तेल आयात करून. त्याच्यावर अदानी, अंबानीच्या फॅक्टर्‍यांमध्ये प्रक्रिया केली. त्याचा नफा त्यांना देऊन मग लोकांना देत असाल तर कोणाचे हित साध्य झाले. कुठे आहे तुमचा ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये