अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

राजे जरा जपून…

संभाजीराजे यांनी पक्षीय राजकारणाच्या गुंत्यात न अडकता स्वतःचा मार्ग निर्माण करावा. स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र कार्यक्रम यातून स्वतंत्र वाटचाल करावी, त्यासाठी त्यांना नक्कीच शुभेच्छा राहतील.

कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांनी वर्षा बंगल्याचेही निमंत्रण नाकारत सोमवारी चक्क कोल्हापूर गाठले. गेले दोन दिवस संभाजीराजे शिवसेनेत दाखल होणार का? शिवसेना संभाजीराजे यांना राज्यसभेची उमदेवारी देणार का आणि महाविकास आघाडी संभाजीराजे यांच्या पाठीशी भक्कम उभी राहणार का, हे प्रश्न चर्चेत होते. संभाजीराजे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली होती. त्यांना राज्यसभेच्या निवडणुकीसाठी सर्व पक्षांच्या पाठिंब्याने अपक्ष उभे राहायचे होते. भाजपसह सर्व पक्षांनी संभाजीराजे यांना मदत केली, तर सहाव्या जागेसाठी निवडून येण्याची कसरत संभाजीराजे यांना करावी लागणार नाही. परंतु हे सहज सोपे आहे, असे दिसत नाही. शिवसेनेला राज्यसभेत आपले संख्याबळ वाढवायचे आहे. गेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीची एक जागा निवडून जात असताना शरद पवार यांच्या विनंतीवरून शिवसेनेने राष्ट्रवादीचा दुसरा उमेदवार राज्यसभेत पाठविला आहे. पैरा फेडण्याची आता राष्ट्रवादीची वेळ आहे. साहजिकच शिवसेना सांगेल त्याच उमेदवाराच्या पाठीशी राष्ट्रवादीला उभे राहावे लागणार आहे. शरद पवार यांनी शिवसेनेचे दोन सदस्य राज्यसभेत पाठवणारच, या आक्रमक भूमिकेपुढे माघार घेतली आहे.

शरद पवार यांच्या वक्तव्यात कमालीचा बदल झाला आहे. शिवसेनेची पाठराखण शरद पवार करताना आता दिसत आहेत. प्रश्न काँग्रेसचा आहे आणि काँग्रेस महाविकास आघाडी म्हणून शिवसेनेच्या उमेदवाराला नक्की मदत करेल. भारतीय जनता पक्षाने अद्यापही आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पक्षाने संभाजीराजे यांना राष्ट्रपतीनियुक्त सदस्य केल्याचा दाखला दिला असून, राष्ट्रवादीने प्रफुल्ल पटेल यांच्याऐवजी संभाजीराजे छत्रपती यांना राज्यसभेवर हमखास निवडून येणार्‍या कोट्याच्या जागेतून निवडून द्यावे, असा खोचक सल्ला दिला आहे, तर शिवसेना आपले दोन उमेदवार निवडून आणण्याच्या निश्चयावर ठाम आहे. राज्यसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील सहा जागांवर सात किंवा त्याहून अधिक उमेदवार उतरल्यास दुसर्‍या क्रमांकाच्या मतांचीही बेरीज केली जाईल. खरेतर संभाजीमहाराज यांच्याविरोधात शिवसेना आणि या दोघांच्याविरोधात भारतीय जनता पक्ष उमेदवार उभे करणार असतील तर मतदानाच्या पुढच्या फेर्‍यांचा निर्णय निर्णायक ठरणार आहे. पहिल्या क्रमांकाच्या मताऐवजी दुसर्‍या क्रमांकांची मते आपल्या उमेदवाराला मिळावीत. यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत आणि घोडेबाजार मोठ्या प्रमाणात होणार आहे. यामध्ये शंका नाही.

छत्रपती शाहूमहाराज यांच्या स्मृतिशताब्दीचे हे वर्ष सुरू आहे. त्यानिमित्ताने संभाजीराजे यांना छत्रपती शाहूमहाराजांचे थेट वंशज म्हणून निवडून द्यावे, असा एक मतप्रवाह आहे. मत व्यक्त करण्यास लोकशाहीमध्ये कोणी आडकाठी करणार नाही व करूही नये. संभाजीमहाराज यांना भाजपने खासदारकी दिली होती. भाजपच्या म्हणण्यानुसार, पक्षाने संभाजीमहाराज यांना मतांसाठी व्यासपीठावर आणणे, भाषणामध्ये त्यांचा वापर करणे, पक्षाच्या ध्येयधोरणांबद्दल प्रचार करणे किंवा छत्रपतींच्या घराण्याचा राजकारणासाठी उपयोग करणे असे काहीच केले नाही, मात्र छत्रपती शिवाजीमहाराजांचे दोनही वंशज भारतीय जनता पक्षाबरोबर आहेत, हा संदेश ठळकपणे अधोरेखित केला आहे. मराठी समाजाचे नेतृत्व शरद पवार यांच्याकडे निर्विवाद असले तरीही मराठा समाजाच्या निष्ठा आणि भावनांच्या आदरस्थानाची जपणूक भाजप करीत आहे आणि त्यामुळे मराठा समाजाच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होतो आहे, हे दाखविण्यात ते यशस्वी ठरले आहेत.

संभाजीराजे हे छत्रपती शाहूमहाराजांचे वंशज आहेत आणि त्यामुळे त्यांना राज्यसभेत पाठवायचे, हा एक विचार सुरू असताना छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा सन्मान करायचा असल्यास संभाजीराजे यांनीच बहुजन समाजातील एखाद्या व्यक्तीला राज्यसभेत पाठवण्याचा आग्रह सर्व राजकीय पक्षांकडे धरला असता, तर ते अधिक आदरणीय झाले असते. छत्रपती शाहूमहाराजांच्या विचारांचा अभ्यासक असणार्‍या व्यक्तीला राज्यसभेत पाठविल्याप्रमाणे शाहू, फुले, आंबेडकर यांच्या नावाचा राजकारणासाठी वापर करणार्‍यांनाही परस्पर चोख उत्तर मिळाले असते, मात्र मराठा आरक्षण आणि स्मृतिशताब्दी या द्विधामध्ये संभाजीराजे आणि त्यांचे समर्थक अडकले आहेत. यातून सुटका करून घ्यायची असेल तर, संभाजीराजे यांनी मराठा आरक्षणाबरोबर मराठा समाजाच्या नेतृत्वासाठी किंगमेकरची भूमिका आता स्वीकारायला पाहिजे. सातार्‍याचे छत्रपती खासदार उदयनराजे भोसले त्यांचे सख्खे चुलतबंधू शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि स्वतः संभाजीराजे छत्रपती भारतीय जनता पक्षाच्या मांडवाखाली असताना आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र येऊन त्रिकोण विशाल केला तर, मराठा समाजाचेही भले होईल. शिवनेरीगडावर शिवजयंतीच्या दिवशी संभाजीराजे यांना दिलेली वागणूक आणि त्यातून त्यांनी नाराजीने त्या समारंभातून काढता घेतलेला पाय राष्ट्रवादी काँग्रेसला त्यांच्याबद्दल किती आदर आहे, हे स्पष्ट करणारा आहे. संभाजीराजे यांनी पक्षीय राजकारणाच्या गुंत्यात न अडकता स्वतःचा मार्ग निर्माण करावा. स्वतंत्र पक्ष, स्वतंत्र विचारधारा, स्वतंत्र कार्यक्रम यातून स्वतंत्र वाटचाल करावी, त्यासाठी त्यांना नक्कीच शुभेच्छा राहतील.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये