मी विधान परिषदेवर जावं ही कार्यकर्त्यांची इच्छा, पण…- पंकजा मुंडे
बीड – Pankaja Munde | राज्यसभेच्या निवडणुकीवरून (Rajya Sabha Elections) सध्या राजकीय वातावरण तापलेलं आहे. त्यासोबतच 20 जूनला महाराष्ट्र विधानपरिषदेच्या १० जागांसाठी निवडणूक होणार आहे. या जागांसाठी प्रत्येक इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे लॉबिंग (Lobbying) करायला सुरूवात केली आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलं आहे.
मी जनतेच्या प्रश्नांवर गेली अनेक वर्ष लढत आहे. आता राज्यात विधान परिषदेच्या १० जागांवर निवडणूक पार पडत आहे. अशावेळी मला विधान परिषदेवर पाठवावं, ही कार्यकर्त्यांची मनापासून इच्छा असल्याचं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली भावना बोलून दाखवली.
पण शेवटी पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेत असतात. पक्ष जो निर्णय घेईल, तो मला मान्य असेल, असंही पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवर पाठवतात की नाही याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.