राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

परिपक्व व्हा…

कोरोना संकटाने जगात जीवन किती क्षणभंगुर आहे, हे दाखवून दिले. नातेसंबंध किती दुरावतात किती जवळ येतात, हेपण कोरोनाने दाखवून दिले. अशा परिस्थितीत भडकावू वक्तव्य करणे आणि त्यावर भडकून दगडफेक करणे, आर्थिक निर्बंध घालणे आणि राजदूतांना जबाब मागणे हेपण फारसे परिपक्वतेचे लक्षण नाही.

भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रवक्त्या नुपूर शर्माचे पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले. कोणीही कोणत्याही धर्मासंदर्भात, धर्मातील साधू-संतांसंदर्भात अनादर करणारी विधाने करू नयेत. आदर बाळगला पाहिजे. तसे ते वागत नसतील तर त्यांचा निषेध व्हायला पाहिजे आणि आम्हीही तो करतो. प्रवक्ते करताना पक्षाच्या ज्येष्ठांनी याबाबत कठोर नियम, नैतिकता, विचार आणि अभ्यास करून घेतला पाहिजे. यासंदर्भात विनोबा भावे यांनी अत्यन्त सुंदर विचार मानला होता. ते म्हणतात, जर मी एखादा धर्म मानत असेल तर सर्व धर्म मानले पाहिजेत आणि एखादा धर्म नाकारत असेल तर सर्वच धर्म नाकारले पाहिजेत.

हा विचार पटणे आणि नंतर कृतीत आणणे अत्यंत अवघड आहे. याचे कारण आपण आपल्या प्रेमात पडलेले असतो. आपले धर्म, आपले विचार, आपली दृष्टी, कृती हीच एकमेव योग्य आणि अंतिम असे आपल्याला वाटत असते. यातून निर्माण होणारे संघर्ष हळूहळू टोकाला जातात. धर्म, जात यावर आधारित अत्यन्त उंच आणि खोल भिंती तयार होतात. या भिंती त्या त्या धर्म आणि धर्मासंबंधित आंधळ्या किंवा बहिर्‍या समर्थकांकडून पुढे नेल्या जातात. इथे नुपूर शर्मा असो किंवा इतर कोणी, कोणत्याही धर्मातले असोत आंधळ्या आणि बहिरेपणाच्या विकारांनी बाधित मंडळींकडून अशी प्रकरणे अजून मोठी केली जातात. कतार, इराण देशांनी नुपूर शर्माच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना थेट दृष्टीचा मार्ग अवलंबला आहे. त्यांनी भारतातून आलेल्या मालावर बहिष्कार घातला आहे. त्यांच्यादृष्टीने ते बरोबर असेल, मात्र त्यापुढे जाऊन भारताने माफी मागणे हा विचार कितपत रास्त आहे? बहुतेक प्रत्येक धर्मातल्या महाविभूतींचा अपमान, आक्षेप घेण्यासारखी वक्तव्ये जगाच्या कानाकोपर्‍यात केली जातात. विकृत मंडळींना त्यात आनंद वाटतो. हेतुतः ते तशी विधाने करतात, कला क्षेत्रात, साहित्यात अभिव्यक्तीस्वातंत्र्य म्हणून प्रसिद्धही करतात. जगाला शांततेचा संदेश देणार्‍या भगवान बुद्धांच्या अप्रतिम, भव्य मूर्ती जमीनदोस्त करतात.

या धार्मिक साक्षरतेच्या अभावाला जागतिक पातळीवर काय करता येईल, हा खरा महत्त्वाचा मुद्दा आहे. विविध धर्म सकृतदर्शनी वेगवेगळे दिसत असले तरी अंतिमतः सगळ्यांची मूलभूत तत्त्वे एकच आहेत. मानवता, शांतता, प्रेम, सद्भाव, दया, करुणा, ममत्व, बंधूभाव, सहिष्णुता, एकमेकांप्रती आदर, समता या विलक्षण सद्गुणांचे बीजारोपण धर्मातून होत असते. मात्र वारंवार ही विचारधारा सगळेच बेगडी प्रचारक, खोटे धर्माभिमानी विसरतात आणि दुराव्याचे प्रसंग निर्माण होतात. धर्म ही जगण्याची व पद्धती स्वीकारलेली जीवनपद्धती आहे. समाजाच्या प्रवाहात विविधता आहे. तो वरपांगी एक, ढोबळमानी सलग वाटत असला तरी त्यात अनेक पीळपेच आहेत. हे पीळपेच जोपर्यंत सहज सुटणारे आहेत, समजूतदारपणाच्या कक्षेत आहेत तोपर्यंत या प्रवाहाची दिशा बदलत नाही. त्याचे एकत्व आणि प्रवाहित्व अखंड राहते. मात्र जेव्हा हे समाजमनात विषारी तत्त्व घेऊन वाहायला लागते तेव्हा प्रवाह खंडित व्हायला लागतो. नुपूर शर्मा असो किंवा प्रत्येक धर्मात असणारी विघ्नसंतोषी मंडळी यांनी त्याचे मतपेटीचे राजकारण बाजूला ठेवायला पाहिजे. धर्म हा घरात सांभाळले जाणारे मूलद्रव्य आहे.

ते सामाजिक जीवनात सार्वजनिक करू नये, याचे भान ठेवले पाहिजे. विषय भोंग्यांचा असो वा सण उत्सवात वाहतुकीच्या रस्त्यांवर मांडव घालायचा याबाबत विवेकाने विचार, कृती केली पाहिजे. देशांतर्गत विवेक विचार जसा आवश्यक आहे, तसाच आंतरराष्ट्रीय पातळीवरही आवश्यक आहे. राष्ट्रीय पातळीवर आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर आर्थिक दहशत निर्माण करणे हा आंतरराष्ट्रीय धर्माचे लक्षण नाही. ज्या तातडीने मुस्लिमबहुल देशांनी भारतीय राजदूतांना बोलावून नुपूर शर्मा वक्तव्याचे जाब मागितले कदाचित ते योग्यही असेल, पण तसेच ज्यावेळी देशातल्या इतर धर्मातल्या मूर्तिभंजन झाले, त्या त्या वेळी धार्मिक भावना दुखावलेल्या देशांच्या राजदूतांना बोलावून दिलगिरीही व्यक्त करायला पाहिजे होती. मात्र तसे झाले नाही. किंबहुना ते धर्माभिमान दाखवून अर्थकारण आहत करीत असतील तर या देशातील त्याच धर्मीयांनी त्या देशांना यापुढे आम्ही माल पाठिवणार नाही. त्यांचा घेणार नाही, असे जाहीर करत राष्ट्राभिमान दर्शवला पाहिजे. रशिया-युक्रेन संघर्षाने उन्मादी अवस्था किती आणि कशी टोकाला जाते, हे दाखवून दिले. कोरोना संकटाने जगात जीवन किती क्षणभंगुर आहे, हे दाखवून दिले. नातेसंबंध किती दुरावतात, किती जवळ येतात, हे पण कोरोनाने दाखवून दिले. अशा परिस्थितीत भडकावू वक्तव्य करणे आणि त्यावर भडकून दगडफेक करणे, आर्थिक निर्बंध घालणे आणि राजदूतांना जबाब मागणे हेपण फारसे परिपक्वतेचे लक्षण नाही.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये