दिघीतील माजी सैनिक भवनाला आयुक्तांचा ‘हिरवा कंदील’

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने दिघी येथे विकसित केलेल्या बहुद्देशीय इमारतीतील दोन मजले माजी सैनिक भवनसाठी देण्यात आले. त्याची कागदोपत्री पूर्तता करण्यात येणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त व प्रशासक राजेश पाटील यांनी सकारात्मक भूमिका घेत कार्यवाही करू, असे आश्वासन दिले आहे. भाजप शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांनी महापालिका भवनात आयुक्त राजेश पाटील यांची भेट घेतली.
यावेळी माजी सभापती चेतन घुले, माजी सैनिक विकास संघाचे अध्यक्ष नरेंद्रसिंह चौहान, उमेशसिंग पनवर, वासुदेव पाटील, वामन वाडेकर, तानाजी गुजर आदी माजी सैनिक उपस्थित होते. माजी सभापती चेतन घुले म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिका बहुद्देशीय इमारत ही आमदार महेश लांडगे स्थायी समिती अध्यक्ष असताना मंजूर केली होती. त्यानंतर ही इमारत तयार झाल्यानंतर त्यातील दोन मजले माजी सैनिक संघाच्या कामकाजासाठी देण्याबाबत निर्णय झाला. तत्कालीन नगरसेवकांनी संबंधित दोन मजले माजी सैनिक विकास संघाच्या नावे करण्याबाबत कागदोपत्री पाठपुरावा केला.
मात्र, प्रशासनाकडून दिरंगाई होत होती.
दरम्यान, यासंदर्भात महापालिका आयुक्त राजेश पाटील यांच्यासोबत आमदार लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. आयुक्तांनी संबंधित दोन मजले माजी सैनिक विकास संघाकरिता देण्यासाठीची कार्यवाही करण्याबाबत आश्वासन दिले आहे. त्यामुळे लवकरच हा प्रश्न मार्गी लागणार आहे.