यूपीआयद्वारे पेमेंट करणं झालं सोपं; आरबीआयनं घेतला ‘हा’ मोठा निर्णय

मुंबई | RBI’S Big Decision – आरबीआय आता यूपीआय अर्थात यूनिफाईड पेमेन्ट्स इंटरफेस संबंधित एक महत्त्वाचा निर्णय घेणार आहे. येत्या काळात क्रेडिट कार्ड यूपीआयला जोडण्यात येणार आहे. त्यामुळे देशातील असंख्य ग्राहकांना, क्रेडिट कार्ड धारकांना फायदा होणार आहे. त्याची सुरवात रुपे कार्डपासून करण्यात येणार असल्याची माहिती आहे.
देशात नोटबंदीनंतर मोठ्या प्रमाणात ऑनलाईन व्यवहारात वाढ झाली आहे. सोबतच यूपीआय मार्फत मोठ्या प्रमाणात व्यवहार वाढू लागले आहेत. यात आणखी भर पडावी यासाठी आरबीआयकडून आणखी एक सुविधा अंमलात आणण्याचा विचार आहे. आता युपीआयच्या माध्यमातून कोट्यवधी ग्राहक केवळ बचतखाते किंवा चालू खात्यातूनच नव्हे तर क्रेडिट कार्डद्वारेही पेमेंट करू शकतील. त्यामुळे युपीआयद्वारे पेमेंट करणं सोपं होईल.
दरम्यान, नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारा जारी केलेल्या रुपे क्रेडिट कार्डद्वारे याची सुरुवात होईल. सिस्टिम विकसित होत असताना इतर कार्ड जसे मेस्ट्रो, व्हिजा क्रेडिट कार्डसारख्या कार्डसाठी देखील ही सुविधा उपलब्ध होणार आहे. या निर्णयाचा शेअरबाजारावरही परिणाम बघायला मिळाला. एसबीआय कार्ड, पेटीएम, ॲक्सिस बॅंकसारख्या बॅंकांचे देखील शेअर्स वधारले आहेत. याचं मुख्य कारण, बॅंकांसोबतच फिनटेक कंपन्यांना ही सुविधा गेमचेंजर मानली जात आहे.