धनंजय तेच करतो जे देवेंद्र सांगतो…!

दखलपात्र |
राज्यसभेची निवडणूक काटे की टक्कर ठरली. भारतीय जनता पक्षाने आपला तिसरा उमेदवार जिंकून आणला. धनंजय महाडिक आणि कोल्हापूरसाठी चंद्रकांत पाटील यांची मान देवेंद्र फडणवीस यांनी उंचावली. फडणवीस यांनी वाचाळपणा न करता नियोजन कसे करायचे असते आणि विजय कसा मिळवायचा असतो हे आपल्या कृतीतून दाखवून दिले.
संयम हा गुण राजकारण्यांसाठी किती आवश्यक असतो आणि आक्रमक कधी व्हायचे, कसे व्हायचे याचे मार्गदर्शन एकलव्य होऊन खा. संजय राऊत यांनी घ्यावे. त्याचबरोबर राजकारणात कोणीही कोणाचा नसतो हे तत्त्व राष्ट्रवादीकडून शिकून घ्यावे. आपण नक्की कोणाबरोबर निघालोय आणि कुठे पोचणार याची अजूनही शिवसेनेने माहिती घ्यावी. काँग्रेसने जी व्यूहरचना अवलंबून आपला उमेदवार निवडून आणला तसे आपल्या शक्तीचा अंदाज घेऊन लढत द्यावी, एवढाच मथितार्थ या निवडणुकीतून निघतो.
जी. ए. कुलकर्णींच्या सर्वोत्तम विदूषक या कथेतील एक वाक्य आहे. पराभूत सांगतात ते तत्त्वज्ञान असते आणि विजयी आचरतात ती नीती असते, अशा आशयाचे. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी आपापल्या सीमित विजयाची खात्री भागवून घेतल्याने शिवसेनेविरोधात जी नीती अवलंबली ती उद्धव ठाकरे यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहे आणि हे दोन्ही पक्ष संजय पवार यांच्या पराभवानंतर कोणतेही तत्त्वज्ञान सांगण्याच्या भानगडीत पडले नाहीत.
लवकरच विधान परिषदेची निवडणूक आहे. यातही भारतीय जनता पक्ष आपले सगळ्यात जास्त उमेदवार उभे करणार आहे . हे उमेदवार निवडून आणण्याची व्यूहरचना त्यांनी कदाचित केलीही असेल. सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्याचे सर्व प्रयत्न अंतिम टप्प्यात असतील. मविआ अद्याप पराभवाच्या धक्क्यातून बाहेर पडण्यापूर्वीच या निवडणुका होतील. हातात केवळ आठ दिवस आहेत. मतांची गोळाबेरीज करून ध्येय साध्य करणे किती अवघड आहे हे राऊत यांना समजले असेल. महाभारतात धनंजय जे करतो ते संजय आंधळ्या धृतराष्ट्राला सांगू शकतो आणि धनंजय केवळ देवेंद्र जे सांगतो ते करतो याचा विसर संजय राऊतांनी पडू देऊ नये, एवढेच.
कोणताही खुलासा नाही. कसलेही स्पष्टीकरण, टीका, टिप्पणी नाही. उलट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी लागलेला निकाल धक्कादायक नव्हता, असे सांगून प्रवक्ते संजय राऊत यांच्या निकालानंतरच्या बडबडीला शून्य किंमत असल्याचे अधोरेखित केले. आता कार्यकर्त्यांना मानसिक दिलासा देण्यासाठी राऊत बोलत असले तरी त्यात दम नाही हे समजणार्याला आणि कार्यकर्त्यांना सहज समजणारे आहे.
मुळात आपली ताकद किती आणि आभासी ताकद किती याचा अंदाज अभ्यासाशिवाय येत नाही. संजय राऊत यांचा अभ्यासून प्रकटावे याच्याशी दूरदूरपर्यंत संबंध नसल्याने केवळ वाचाळपणा करून त्यावर मते मिळतील असा त्यांचा जो कयास होता तो किती बिनबुडाचा होता हे त्यांना आता समजले असावे अशी अपेक्षा आहे. त्यांच्याच रांगेत लगेच त्यांच्या मागे उभे असलेले राष्ट्रवादीचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांच्या विचारात या निकालानंतर ज्ञानाचा दिवा लागला असेल असे वाटते. उचलली जीभ लावली टाळ्याला हे आता सगळ्याच पक्षांच्या प्रवक्त्यांनी थांबवले पाहिजे. प्रवक्ता हे पद किती महत्त्वाचे आहे याची जाणीव पक्षाच्या अध्यक्षांनी किमान करून दिली पाहिजे.
राज्यसभेची निवडणूक सार्वत्रिक निवडणुकांसारखी नसते. निवडून आलेली मंडळी मतदान करीत असतात. त्यांना अशाप्रकारच्या मतदानाची माहिती आणि सवय असते. मत बाद केली तरच होतात आणि अशा निवडणुकीत मत बाद करणे याचे अनेक अर्थ निघतात. या निवडणुकीत काय घडलं असावं याची विश्लेषणे यायला सुरुवात होणार, पण मतदानाच्या आदल्या दिवशी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांसाठी कोट्यात वाढ केली आणि त्याच रात्री शिवसेनेच्या उमेदवाराचा म्हणजे संजय पवार यांचा पराभव नक्की झाला होता.
बाद होणारी मते, फुटणारी मते यांचे नियोजन करू शकत नाही, मात्र कोटा वाढवला, कमी केला तर मतांवर परिणाम होणार होता आणि झालाही! दोन्ही काँग्रेसने आपल्या उमेदवारांच्या सुरक्षेसाठी कोट्यात म्हणजे मत देण्यात वाढ केली. मत मोजणीच्या फेर्यातून शक्ती प्रदर्शन आणि मते फुटली हेही जाहीर झाले. दुसर्या क्रमांकाची मते अधिक निर्णायक होती. त्याचे नियोजन मविआ म्हणजे शिवसेनेला ते करता आले नाही. देवेंद्र फडणवीस यांनी ते केले आणि निकाल धनंजय महाडिक यांच्या बाजूने लागला.
मुळात मविआ दरवेळी भाजपने निवडणूक लावली असे म्हणत होती. याचा अर्थ असा होता की, आमच्याकडे पुरेसे संख्याबळ आहे. आम्ही जिंकणार आहे आणि राजकारणातल्या सौहार्दतेचा भाग म्हणून भाजपने उमेदवार उभा करू नये. ती जागा आपल्याच हक्काची आहे असा शिवसेनेचा समज होता. त्यातून संभाजी छत्रपतींना अटी घालून मराठा समाजाला दुखवले. नाराज केले. यात हुशार निघाले ते शरद पवार. शरद पवार यांनी गेल्या निवडणुकीत फौजिया खान यांना शिवसेनेच्या जागेवरून निवडून आणले. स्वतः राष्ट्रवादीच्या कोट्यातून निवडून आले.
आता स्वतःची एक जागा जी पक्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची होती ती प्रफुल्ल पटेल यांना निवडून आणले. त्यांना दगाफटका होऊ नये यासाठी मतांचे प्रमाण वाढवले. म्हणजे ज्या राष्ट्रवादीला या दोन निवडणुकात दोन जागा मिळाल्या असत्या त्यात त्यांना तीन जागा मिळाल्या आणि शिवसेनेला सहयोगी पक्षांनी मदत केली असती आणि मागच्या वेळची जागा शिवसेनेने राष्ट्रवादीला दिली नसती तर शिवसेनेच्या चार जागा झाल्या असत्या, त्या केवळ दोनवर आल्या. उमेदवार देण्यात शिवसेनेने चूक केली. मतदानात शिवसेनेने मार खाल्ला. नियोजनात ढिसाळपणा होता. फाजील आत्मविश्वास होता. अवलंबून रहाण्याची पातळी कमाल होती. सगळ्यात महत्त्वाचे आपल्याला कोण फसवतेय याचा अंदाज
पान ५ वरुन
शेवट्पर्यंत त्यांना आला नाही. मतदानाला जाताना संजय राऊत ज्या पद्धतीने आज आज देखो होता है क्या म्हणत हात उडवत चालले होते किंवा अमोल मिटकरी , भुरपचा आज पासून काउंट डाऊन सुरु झालाय असे सांगत होते ते कशाच्या जोरावर हे त्याचे त्यांनाच माहिती. !
या पुढे विधान परिषदेची निवडणूक आहे. यात हि भारतीय जनता पक्ष आपले सगळ्यात जास्त उमेदवार उभे करणार आहे . हे उमेदवार निवडून आणण्याची व्यहरचना त्यांनी कदाचित त्यांनी केली हि असेल . सदाभाऊ खोत यांना निवडून आणण्याचे सर्व प्रयत्न अंतिम टप्यात असतील. मविआ अद्याप पराभवाच्या धक्यातुन बाहेर पडण्यापूर्वीच या निवडणूका होतील. हातात केवेळ आठ दिवस आहेत. मतांची गोळाबेरीज करून ध्येय साध्य करणे किती अवघड आहे हे राऊत यांना समजले असेल.महाभारतात धनंजय जे करतो ते संजय आंधळ्या धृतराष्ट्राला सांगू शकतो आणि धनंजय केवळ देवेंद्र जे सांगतो ते करतो याचा विसर संजय राऊतांनी पडू देऊ नये. एवढेच.
_मधुसूदन पतकी