अर्बन बँक सस्पेन्स घोटाळा!

अ.नगर ः नगर अर्बन मल्टीस्टेट शेड्यूल बँकेत सस्पेन्स खाते घोटाळ्यातील भाजपचे माजी नगरसेवक सुरेंद्र दिलीप गांधी, त्यांचे बंधू देवेंद्र दिलीप गांधी व चुलती संगीता अनिल गांधी या तिघांना न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावले आहे.
सदर बँकेच्या खटल्याची सुनावणी २१ जून रोजी होणार असून, या तिघांनाही त्यास उपस्थित राहण्यास सांगितले आहे. बँकेच्या सस्पेन्स खाते घोटाळ्याप्रकरणी भारतीय रिझर्व्ह बँकेने नगर अर्बन बँकेला ५ लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. या प्रकरणी न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या खटल्यात गांधी परिवारातील कोणाचेही नाव नव्हते. मात्र अर्बन बँकेचे २००९-१० लेखा परीक्षण मे. गिरासे पाटील, पवार व डावरे असोसिएशन यांनी केलेल्या परीक्षणात या सस्पेन्स खात्याचा गंभीर घोटाळा उघड झाला.
तत्कालीन चेअरमन स्व. दिलीप गांधी यांची मुले व भावजयी यांच्या मालकीची फर्म मे. मनसुख मिल्क प्रॉडक्ट या खात्यात पैसे शिल्लक नसतानाही मोठ्या रकमेचे १५ धनादेश पास झाले.
या प्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हाही दाखल झाला होता. मात्र गुन्ह्याचे चार्जशीट दाखल होताना गांधी परिवाराची नावे आरोपीच्या नावातून वगळली गेली होती. सस्पेन्स घोटाळा प्रकरणाचा ठप्पा बँकेचे कर्मचारी व अधिकारी यांच्यावर ठेवण्यात आला होता. त्यानंतर कर्मचारी व अधिकारी यांनी या प्रकरणात अटकपूर्व जामीनही घेतला होता. सदरचा खटला २०१६ पासून न्यायालयात प्रलंबित होता. सस्पेन्स खाते गैरव्यवहारात सुरेंद्र दिलीप गांधी, देवेंद्र दिलीप गांधी व भावजयी संगीता अनिल गांधी यांचाही सहभाग असल्याचे स्पष्ट झाले.
दरम्यान, बँकेचे सभासद विनोद अमोलचंद गांधी यांनी राज्याच्या सहकार आयुक्तांकडे गुन्ह्याची तक्रारही केली होती. याचवेळी अर्बन बँकेला मल्टीस्टेटचा दर्जा देण्यात आला व सहकार आयुक्ताचे नियंत्रण संपले.