महाराष्ट्रराष्ट्रसंचार कनेक्ट

जुन्या परंपरा जपत पन्नास वर्षांनी पुन्हा एकदा लग्न सोहळा

गिरमे परिवाराचा उपक्रम

सासवड : पन्नास वर्षांपूर्वी पार पडलेल्या लग्न सोहळ्याची पुनरावृत्ती करत पुन्हा एकदा त्याच पद्धतीने लग्नाचा बार उडवत एक आगळावेगळा विवाह सासवड येथे नुकताच झाला. सासवड येथील प्रथितयश व्यावसायिक व सामाजिक कार्यात नेहमी अग्रभागी असलेल्या सुधाकर साधू गिरमे तथा सुधाभाऊ यांचा व त्यांच्या पत्नी अंजना गिरमे म्हणजे पूर्वाश्रमीच्या वाघ यांचा लग्नाचा पन्नासावा वाढदिवस येथील कर्‍हाबाई मंदिरात नुकताच चक्क दोघांचे लग्न लावून साजरा करण्यात आला. जुन्या काळातील नवरदेव-नवरीचा पेहराव, त्या काळातील कागदी मुंडावळ्या, सजवलेल्या बैलगाडीतून नवरा-नवरीची वरात, जुन्या काळातील पितळी भांड्यांची झाल, कंदिलांचा प्रकाश पत्रावळीवर वर्‍हाडी मंडळींना भात आमटी अन् कळीचा बेत तोसुद्धा खाली बसून भारतीय बैठकीत… नऊवारी साड्या दागिने लेवून नटलेल्या कलवर्‍या…

पायजमा शर्ट टोपी घातलेले नागरिक, सारं सारं अगदी जुन्या काळानुसार हे सर्व पार पडले. आज काल खूप मोठा खर्च करून झगमगाटात लग्न सोहळे साजरे केले जातात या पार्श्वभूमीवर आजच्या तरुण पिढीला पूर्वीच्या लग्न प्रथा, साधेपणा याविषयी माहिती व्हावी, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे गिरमे परिवाराकडून सांगण्यात आले. सुधाभाऊ गिरमे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत आपल्या सर्व भावांची आर्थिक, प्रापंचिक घडी बसवण्यात मोलाचा वाटा उचलला. त्यातून उतराई होण्यासाठीदेखील हा सोहळा केल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. सासवडचे रहिवासी असलेल्या प्रसिद्ध सिनेकलादिग्दर्शक संदीप ईनामके व गिरमे यांच्याच परिवारातील आणि सिनेसृष्टीशी निगडित असलेल्या आशिष गिरमे यांनी याकामी मोलाचे सहकार्य करीत हा जुन्या काळातील लग्न सोहळा हुबेहूब उभा केला. सुधाभाऊ यांचे बंधू मधुकर, सोपान, ज्ञानेश्वर, तुकाराम व संतोष, विलास, आशिष, ओंकार, रोहिणी, रुपाली, संकेत यांसह भावजय, सुना, नातवंडे यांनी या सोहळ्याचे आयोजन केले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये