ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्रशेत -शिवार

धरणे भरूनही तहान टँकरवरच…

पुणे : मागील पावसाळ्यात शहराला पाणीपुरवठा करणारे चारही धरणे फुल तुडुंब भरली होती. तरीही काही ग्रामीण भागांत तसेच शहरातील बहुतांश ठिकाणी नागरिकांची तहान आजही टँकरने भागविली जात असून पुणेकरांना आतापासूनच टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असल्याचे विदारक चित्र आहे. विशेष म्हणजे, चारही धरणसाठ्यात अत्यंत कमी ३५ टक्केच पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या काळात निश्चितच पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील काळात पाणीपुरवठा विभाग व महापालिका प्रशासन काय भूमिका घेतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

  • समाविष्ट २३ गावेही पालिकेच्या पाण्यापासून वंचित
  • पाणीचोरी, गळतीच्या प्रश्नाचा वाद चव्हाट्यावर

पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही ४ धरणे आहेत. या धरणांची पाणी साठवणक्षमता २९.१५ टीएमसी आहे. धरणे गेल्या पावसाळ्यात १००% भरली. त्यामुळे यंदा पुण्यावर पाणीकपातीची वेळ येणार नाही, अशी हमी देण्यात आली. प्रत्यक्षात जलसंपदा विभागाने मुठा उजव्या कालव्यातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्याचे कारण दाखवून धरणे रिकामी करण्याचा सपाटा लावला आहे. त्यामुळे यंदा अवघे १०.८२ अब्ज घनफूट (टीएमसी) म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेत धरणांमध्ये दोन टीएमसी पाणी कमी आहे. गेल्या वर्षी १२.७१ टीएमसी पाणी होते. परंतु, आता जून २०२२ मध्ये केवळ ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने येत्या काही दिवसात तीव्र पाणीटंचाईचा सामना पुणेकरांना करावा लागणार आहे.

पाणीटंचाईसाठी सात कोटींचा निधी…
विभागातील पाच जिल्ह्यांतील गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली असल्याने निधी उपलब्ध करून देण्यासाठी विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी राज्य सरकारकडे प्रस्ताव दाखल केला होता. त्यानुसार राज्य सरकारने सात कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. हा निधी जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांमार्फत वितरित केला जाणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आली आहे. मात्र, हा निधी कधी उपलब्ध होईल हे सांगणे आताच शक्य नाही.


पावसाच्या तोंडावर शहरातील प्रामुख्याने बाणेर, कात्रज, खराडी, कोंढवा, हडपसर, बावधन, वडगाव शेरी आदी भागात पाणीटंचाईची बिकट परिस्थिती असल्याचे पाहावयास मिळत आहे. त्यामुळे टँकरनेच पाणी विकत घ्यावे लागत आहे. समाविष्ट नवीन गावांमध्ये पाणीप्रश्न पेटला आहे. या भागातील नागरिकांना अंदाजे ९०० ते १ हजार रुपयांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. पाणीगळती या परिस्थितीमागील प्रमुख कारण असल्याचे सांगण्यात येते. मात्र, यामध्ये काही तथ्य नसल्याचे जाणकारांचे मत आहे.

३० ते ३५ टँकरने पाणीपुरवठा..
धरण साठ्यातील पाण्याचा साठा दिवसेंदिवस कमी होत चालला असताना पुणे जिल्ह्यातील आंबेगाव, जुन्नर, खेड आणि शिरूर या तालुक्यांतील सुमारे ५४ हजार ६१४ नागरिक पाण्याविना तहानलेले आहेत. त्यांची तहान भागविण्यासाठी ३० ते ३५ टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. २० गावे आणि १५२ वाड्यांमध्ये पाणीप्रश्नाने भीषण रूप धारण केले आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून योग्य निर्णयाची अपेक्षा आहे.

पुणे महापालिकेकडून कालव्यातून बेसुमार पाणीउपसा करण्यात येत असल्याने पाण्याची कमतरता भासत असल्याचा आरोप जलसंपदा विभागाकडून करण्यात येत होता. सध्या कालव्याद्वारे पाणी उचलणे बंद केले. जलसंपदा विभागाकडून शेतीला, पिण्यासाठी जिल्ह्याच्या ग्रामीण भागाला मुठा उजवा कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या कालव्यात बेकायदा पंप टाकून पाणीचोरी करण्यात येते. कालव्याजवळ विहिरी खोदून पाणीचोरी केली जाते. तेच पाणी टँकरने विकले जाते. या व्यवहारातून ‘टँकरमाफिया’ पाण्यासारखा पैसा कमाविता.

पुणे शहर अथवा जिल्ह्याला किमान दोन महिने पुरेल एवढा पाणीसाठा चारही धरणांत उपलब्ध आहे. त्यामुळे पुणेकरांनी काळजी करण्याचे काहीच कारण नाही. टंचाईग्रस्त ग्रामीण भागात महापालिकेतर्फे टँकरने पाणी पुरविले जात आहे. समाविष्ट नवीन सर्वच गावांमध्ये लवकरच पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाईल.
_अनिरुद्ध पावसकर , पाणीपुरवठा अधिकारी (मनपा)

विभागातील पाच जिल्ह्यांपैकी सर्वांत जास्त पाणीटंचाई पुणे जिल्ह्यातील गावांमध्ये निर्माण झाली आहे. पुण्यात ३६ गावे आणि २५३ वाड्यांमधील ९६ हजार ३८० नागरिकांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. ५४ टँकरने संबंधित नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामध्ये ४५ टँकर खासगी आणि नऊ सरकारी टँकर आहेत. जिल्ह्यातील आंबेगाव, बारामती, जुन्नर, खेड, पुरंदर, भोर आणि शिरूर या तालुक्यांमध्ये नागरिकांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.

खासगी टँकरचालकांना जीपीएसप्रणाली सक्तीची
पाणीटंचाईसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीचा वापर हा प्राधान्याने टँकरने पाणीपुरवठा करणे, विहिरी अधिग्रहण करणे आणि नवीन विंधन विहिरी घेणे यासाठी वापरण्याच्या सूचना राज्य सरकारने दिल्या आहेत. सध्या पाच जिल्ह्यांमध्ये ७० टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्यामध्ये ४५ खासगी टँकर आहेत. खासगी टँकरने पाणीपुरवठा करताना संबंधित टँकरला जीपीएसप्रणाली असण्याची सक्ती करण्यात आली आहे. जीपीएसप्रणाली नसलेल्या खासगी टँकरला बिले देण्यात येऊ नये, असे आदेश राज्य सरकारने दिले ओहत.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये