“हिम्मत असेल तर समोरासमोर या आपण दोघेही..” उदयनराजेंचं थेट अजित पवारांना आव्हान

उपमुख्यमंत्री अजित पवार माण, खटाव तालुक्यात दौऱ्यावर असताना साताऱ्यातील एमआयडीसीमध्ये कंपन्या जास्त का आल्या नाहीत यासंदर्भात बोलताना त्यांनी उदयनराजेंवर अप्रत्यक्षपणे आरोप केले होते. या एमआयडीसीचा विकास नेत्यांच्या हप्त्यांमुळे आणि खंडणीमुळे झाला नाही. असा आरोप अजित पवारांनी केला होता. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यात प्रतिक्रिया दिली आहे. ‘हिम्मत असेल तर समोरासमोर या’ असं आव्हानच अजित पवारांना केलं आहे.
माझ्यावर खंडणीचा आरोप करता, पण मी भ्रष्टाचाराचा उघडपणे विरोध करतो. आणि बोलतो. खंडणी, टक्केवारीची भाषा करता, मग हिम्मत असेल तर समोरासमोर या, आपण दोघेही ईडीच्या चौकशीला उभे राहू. आगोदर माझी चौकशी होऊद्या असं आव्हान उदयनराजेंनी नाव न घेता अजित पवारांना केलं आहे.
खंडणी मागणारे कोणी मंत्री संत्री असतील त मला माहिती नाहीत. त्याचं मला काहीही घेण देण नाही. माझ्यावर खंडणी मागितल्याचा आरोप झाल्यानंतर मी काही बोललो तर घरचा आहेर बोललं जातं. पण मी भ्रष्टाचाराविरोधात उघडपणे बोलतो, असंही उदयनराजे यावेळी म्हणाले.