एकनाथ शिंदेंच्या भूमिकेवर नाना पटोलेंची प्रतिक्रिया; म्हणाले, महाराष्ट्रात आलेल्या…

मुंबई | Nana Patole On Eknath Shinde – काल विधानपरिषदेचा निकाल जाहीर होण्यापूर्वीपासूनच शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे नॉट रिचेबल आहेत. ते शिवसेनेच्या 12 पेक्षा जास्त आमदारांना घेऊन गुजरातला गेले असल्याची माहिती आहे. त्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आलेला दिसत आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत राजकीय नेत्यांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यावर राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. अशातच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाना पटोले यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं आहे की, “भाजपकडून केंद्रीय सत्तेचा, तपास यंत्रणेचा दुरुपयोग करून राजकारण सुरू आहे. त्याचाच हा एक अध्याय आहे. भाजपा केंद्रातील सत्तेचा दुरुपयोग करतंय हे लपलेलं नाही. सत्तेतून पैसा आणि त्यातून अधिक सत्ता हीच त्यांची रणनीती राहिली आहे. भाजपानं असत्याचा मार्ग घेतला आहे. यात सत्याचा विजय होईल. हे थोड्या वेळेचं आहे. ऊन सावली हा निसर्गाचा नियम आहे. पण महाराष्ट्रात आलेल्या उन्हाचे सावलीत रूपांतर होईल. हे सगळं निवळेल आणि सगळं व्यवस्थित होईल”, असं नाना पटोले म्हणाले आहेत.
दरम्यान, एकनाथ शिंदेंना पाठिंबा देणाऱ्या आमदारांच्या गटामुळे शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊन राज्यातील सरकार पडणार का? असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. त्यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले, “दिवसा बहुमताची स्वप्न पाहणाऱ्या लोकांसाठी तो आकडा पार पाडणं हे अजून फार दूर आहे. महाविकास आघाडीला अजून कोणतीही अडचण आहे हे मी मानत नाही. आमच्या पक्षात काल जी बंडखोरी झाली, त्याचं आत्मपरीक्षण करून त्यासंदर्भात हायकमांडला माहिती दिली जाईल”.