एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा पॉवरफुल कसेकाय? वाचा शिंदेंचा राजकीय प्रवास

मुंबई : सध्या महाराष्ट्रात जो राजकीय भूकंप आलेला आहे हा घडवून आणणारी व्यक्ती एवढी पॉवरफुल असेल असं कोणालाही वाटलं नसावं. या भूकंपात सगळ्यात अगोदर शिवसेनेचं सत्तेचं घर पडणार असल्याचं दिसत आहे. हा भूकंप घडवून आणणारी व्यक्ती हिदेखील शिवसेनेतीलच असल्याने ठाकरे सरकारचा केसाने गळा कापला जातोय असं वाटत आहे.
शिवसेनेचे एकनाथ शिंदे गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेबरोबर आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला अनेकवेळा संघर्षातून बाहेर काढण्यासाठी मदत केलेली असल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे जुने आणि अत्यंत निष्ठावंत कार्यकर्त्यांपैकी एक समजले जातात. शिवसेनेचे हिंदुत्व त्यांच्या नसानसांत भिनलेल असल्याचं म्हटले जाते. मात्र सध्या संपूर्ण शिवसेना पक्ष संकटात आणण्यात यांचाच वाटा आहे.
एकनाथ शिंदे यांची राजकीय कारकीर्द
एकनाथ शिंदे हे १९९७ मध्ये पहिल्यांदा ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले होते. त्यानंतर २००१ साली त्यांची ठाणे महानगरपालिकेत सभागृह नेते पदी निवड झाली होती. २००४ मध्ये ठाणे विधानसभा मतदार संघातूनच ते आमदार देखील झाले. त्यानंतर सलग तीन निवडणुकींमध्ये म्हणजे २००९, २०१४ आणि २०१९ मध्ये ते आमदार म्हणून कायम निवडून येत राहिले.
२०१४ मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांच्याकडे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मात्री पदही होते. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार मध्येही ते नगरविकास मंत्री म्हणून कार्यरत आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांच्या निष्ठावंत शिवसैनिकांपैकी एक असणारे एकनाथ शिंदे हे पहिल्यापासूनच कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार कार्यरत आहे. मात्र शिंदे या आघाडीमुळे समाधानी नसल्याचे दिसत आहे. शिवसेना आपलं हिंदुत्व विसरत असल्याचं ते म्हणत आहेत. शिवसेनेत अनेक आमदार हे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी आहेत. त्यांनाही शिवसेनेने राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस पक्षासोबत आघाडी स्थापन करणे आवडलेले नाही. त्यामुळेच तीस पेक्षा जास्त आमदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचे दिसत आहेत.