राष्ट्रवादी अॅक्शन मोडमध्ये; शरद पवारांचे सर्व आमदारांना मुंबईत पाचारण!

मुंबई : (NCP On Action Mode) बुधवार दि. २२ रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मुख्य नेत्यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर राज्यीतील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना मुंबईला पाचारण करण्यात आले आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात घडत असलेल्या राजकीय घडामोडी पाहाता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना मुंबईत बोलवण्यात आले आहे.
दरम्यान, शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीला सरकारला भूकंपाचे हादरे बसत आहेत. या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पक्षाच्या सर्व आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश दिले आहेत. त्यानंतर शिवसेनेनं देखील आपल्या सर्व आमदारांना बैठकीला हजर राहण्याचं पत्र पाठवलं आहे.
सध्या चालू असलेल्या राजकीय घडामोडींवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ०५ः०० फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. राजकीय नाट्याच्या पार्श्वभूमीवर ते काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.