भाईंच्या द्रष्टेपणाची योग्य दखल नाही

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. शरद जावडेकर यांचे मत
१९९० च्या दशकात येऊ घातलेले जागतिकीकरण, उदारीकरण आणि खासगीकरणामुळे समाजातील विषमता वाढीस लागून आदर्श समाजरचनेपासून आपण परत दूर जाऊ, असे भाकीत भाईंनी केले होते, परंतु त्यांनी या तिन्ही घटकांची केलेली चिकित्सा गांभीर्याने घेतली गेली नाही. आज जागतिक पातळीवरील अर्थतज्ज्ञांपासून ते अनेक राष्ट्रांच्या प्रमुखांपर्यंत प्रत्येकजण या तिन्ही घटकांच्या दुष्परिणामांबाबत जाहीर चिंता व्यक्त करीत आहेत.
पुणे ः भाईंच्या द्रष्टेपणाची महाराष्ट्र आणि भारताने योग्य दखल घेतली नाही, असेच खेदाने म्हणावे लागते, असे मत ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. शरद जावडेकर यांनी व्यक्त केले. ज्ञान फाउंडेशनतर्फे भाई वैद्य यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. शरद जावडेकर यांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते भाई वैद्य कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पुरस्काराला उत्तर देताना जावडेकर बोलत होते.
यावेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता राजेंद्र पवार, कृषी परिषदेचे उपाध्यक्ष विजय कोलते, आरोग्य सेनेचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. अभिजीत वैद्य उपस्थित होते. यावेळी पुरंदर तालुक्यातील पिसर्वे गावाच्या ग्रामपंचायतीला लोकनेते भाई वैद्य ग्रामविकास पुरस्कार, तसेच हवेलीच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांना लोकनेते भाई वैद्य कार्यनैपुण्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सरपंच बाळासाहेब कोलते यांनी पुरस्कार स्वीकारला.
जावडेकर म्हणाले की, सामाजिक आणि राजकीय स्तरावर भाईंनी त्यांच्या कृतिशील आचरणाद्वारे जे मापदंड घालून दिले आहेत त्या तुलनेत त्यांच्या नावाने पुरस्कार स्वीकारताना संकोचल्याची भावना जागी होते. समाजवाद हा शब्ददेखील त्या काळात बदनाम झालेला होता, अशा नकारात्मक वातावरणात समाजवादाचा पुरस्कार करणारे भाई एकमेव होते. भाईंनी शिक्षण क्षेत्रात निर्णायक भूमिका घेत बालवाडीपासून पदव्युत्तरपर्यंत मोफत शिक्षण मिळाले पाहिजे, अशी भूमिका मांडली होती.