उद्धव ठाकरे यांना कायदेशीर सापळ्यात अडकवण्याची भाजपची रणनीती!

मुंबई : ( BJP On Uddhav thackeray) बंडखोर शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मूळ शिवसेना आपलीच असल्याचा दावा केल्या आहे. या पार्श्वभुमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची कायदेशीर कोंडी करण्याची आणि त्यांना चीतपट करण्याची रणनीती भाजपने आखली आहे. आपल्याकडे ४० हून अधिक आमदार असल्याने मूळ शिवसेना विधिमंडळ पक्ष म्हणून मान्यता मिळावी. त्याचबरोबर धनुष्यबाण हे अधिकृत निवडणूक चिन्ह मिळविण्यासाठी शिंदे गटाकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे अर्ज सादर करण्यात येणार आहे.
दरम्यान, आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाहीत. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर चालणारे शिवसेना कार्यकर्ते आहोत. विधिमंडळ गटनेताही मीच आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांच्या गटाने मुख्य प्रतोदपदी सुनील प्रभू यांच्याऐवजी भरत गोगावले यांची निवड केली आहे. या नियुक्तीला मान्यता देण्याची विनंती विधानसभा उपाध्यक्षांना केली आहे.
बुधवार दि.२३ रोजी उद्धव ठाकरे म्हणाले, मी मुख्यमंत्रीपद आणि शिवसेना पक्षप्रमुख पदाचा राजीनामा देतो. मात्र, बंडखोर आमदारांनी मागे फिरावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेले आवाहन शिंदे गटाने फेटाळले आहे. त्यामुळे आता विधिमंडळ, निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत कायदेशीर लढाई करण्याची तयारी भाजपने कायदेतज्ज्ञांच्या मदतीने केली आहे.