नियोजित पालखीतळावरील मुख्य लाईनसह तारा बदलल्या

इंदापूर येथे जगद्गुरू संतश्रेष्ठ श्री तुकाराममहाराज पालखी सोहळ्याचा दोन दिवस मुक्काम आहे. येणार्या सर्व वारकर्यांची प्रशासनाकडून कसलीही गैरसोय होणार नाही. मैदानावरील वीज खांब व वायर बदललेल्या आहेत. तसेच मैदानावरील सुविधांचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे काम प्रशासनाकडून चालू आहे.
रामराजे कापरे, मुख्याधिकारी,
इंदापूर नगरपरिषद, इंदापूर
सागर शिंदे
इंदापूर : इंदापूर नियोजित पालखीतळावर वीजतारांचा धोका या मथळ्याखाली दै. ‘राष्ट्रसंचार’ने रविवारी बातमी प्रसिद्ध केल्यानंतर वीज वितरण व संबंधित प्रशासनात वेगवान हालचाली होऊन २४ तासांच्या आत या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
इंदापूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या (आयटीआय)च्या मैदानावर शासनाच्या वतीने बांधण्यात आलेल्या नियोजित पालखीतळावर असलेल्या वीज वितरणच्या जुन्या खांबावरील तारा अनेक दिवसांपासून जुन्या झालेल्या होत्या. त्यामुळे त्याच्या वीज वितरण होत असलेल्या तारा गळून खाली उतरले असल्यामुळे त्या मैदानात वीज तारांचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या मैदानावर मुक्कामी येणार्या वारकर्यांचा जीवाला धोका झाला असता.
तत्पूर्वी या तारा वीज वितरण कंपनीच्या अधिकार्यांनी बदलून घ्याव्यात, अशी मागणी इंदापूरमधील सुज्ञ नागरिकांनी केली होती. दररोज पावसाची हजेरी चालूच आहे. मैदान मातीचे असल्याने सर्वत्र ओलावाच राहणार आहे. तत्पूर्वी तारा बदलून घेणे आवश्यक होते. त्याचे काम वीज वितरण व बांधकाम विभागाने राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण करून घेतले आहे. मैदानावर असलेली मुख्य वीजवाहक खांब, मैदानावर बाजूला घेण्यात आली आहे. तसेच संपूर्ण मैदानात विजेची व्यवस्था करण्यात आलो आहे. तसेच खांबांवर एरियल बेंच पीव्हीसी कोटेड वायर टाकण्यात आल्या आहेत. खांबांना सुरक्षेसाठी असलेली ताण तारांना (स्टे प्रोटेक्शन वायर) टाकण्यात आली आहे.