एकनाथ शिंदें पडणार तोंडावर?,सत्तासंघर्षातील ‘ती’ खेळी फसणार!
मुंबई : बंडखोर एकनाथ शिंदे यांच्याकडून विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना हटविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. सत्ताधारी शिवसेना पक्ष सोडला नसल्याचे बंडखोर गटाचे म्हणणे आहे. सत्ताधाऱ्यांनीच पाठिंबा दिलेले उपाध्यक्ष असताना दोन तृतीयांशपेक्षा कमी आमदारांच्या सह्या असलेली नोटीस ही एकप्रकारे शिंदेगटासाठी अडचणीची ठरण्याची शक्यता आहे. यामुळे शिंदें गट तोंडावर पडणार असून, त्यांची ही खेळी त्यांच्यावरच उलटणार आहे असे सांगण्यात आहे.
दरम्यान, देण्यात आलेल्या नोटीसवर शिवसेना बंडखोर शिंदे गटातील दोन तृतीयांशच्या हिशेबाने ३७ नव्हे तर ३४ आमदारांच्या सह्या आहेत. त्यामुळे या नोटीसच्या वैधतेबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. झिरवळ यांना हटविण्यासाठी शिंदे गटाने २२ जून रोजी उपाध्यक्ष कार्यालयात नोटीस बजावली. राज्यघटनेतील कलम १७९ आणि विधिमंडळ नियमावलीतील कलम ११ नुसार ही नोटीस असून त्यावर ३४ आमदारांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
झिरवळ हे एकमताने निवडून आले, तेव्हा महाविकास आघाडीचे संख्याबळ १७० होते. या आघाडीत शिवसेनेचा समावेश असताना आणि पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदीनुसार दोन तृतीयांश आमदारांनी फुटून निघून अन्य राजकीय पक्षात विलीन होणे आवश्यक आहे. शिवसेनेच्या संख्याबळानुसार किमान ३७ आमदारांनी पक्षातून बाहेर पडणे आवश्यक होते. पण ही संख्या गाठण्याआधीच व फुटून निघून दुसऱ्या पक्षात जाण्याआधीच अविश्वास ठरावाची नोटीस देण्यात आली.