खेलो इंडिया खेळाडूंसाठी एक महत्त्वाकांक्षी योजना

शिवाजी गोरे, क्रीडातज्ज्ञ
पुणे हे विद्येचे माहेरघर म्हणून आधीपासूनच ओळखले जाते. पण काही वर्षांपासून पुण्याचा क्रीडानगरी म्हणूनही लौकीक आहे. ज्याप्रमाणे शालेय जीवनात काही विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देऊन डॉक्टर, अभियांत्रिकी, प्राध्यापक, शास्त्रज्ञ, आयटी इंजिनिअर होण्याची स्वप्ने पाहतात. तशीच स्वप्ने खेळाची आवड असलेले विद्यार्थी पाहत असतात. कोणाला क्रिकेटर व्हायचे असते, तर कोणाला आॅलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या शहरासह, राज्याचे व देशाचे नावलौकिक करण्याची मनापासून इच्छा आणि जिद्द असते आणि तशा प्रकारची स्वप्ने ते पाहत असतात. पण ही स्वप्ने पाहत असताना येणाऱ्या अडचणी अनेक असतात. या अशा खेळाडूंंची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी २०१८पासून केंद्रीय क्रीडा मंत्रालय सरावले आहे. आॅलिम्पिक खेळाडू घडविण्यासाठी केंद्राच्या क्रीडा विभागाकडून २०१८ पासून खेलो इंडिया या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. यामधून उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून त्यांचा सरावादरर्म्यानचा खर्च क्रेंद्राच्या वतीने केला जातो. सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकविजेत्यांना उच्च दर्जाचे प्रशिक्षण आणि दरमहा शिष्यवृत्ती, त्यांच्या प्रशिक्षकांचे मानधन दिले जाते. यामुळे राज्यातील मोठी स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंच्या जिद्दीला मोठे प्रोेत्साहन मिळत आहे.
खेलो इंडियाच्या अंतर्गत अनेक उपक्रम केंद्रीय क्रीडा मंत्रालयाच्यावतीने राबविण्यात येत आहेत. देशातील खेळाडूंंचे टॅलेंट हंट, भारताच्या विविध भागात क्रीडा सुविधा निर्माण करून दिली जाते. अद्ययावत प्रशिक्षण केंद्र सुरू करून तेथे उच्च दर्जाचे प्रशिक्षण उपलब्ध करून देणे हे आहे. जेथे स्पर्धा होते त्या शहरात क्रीडा सुविधा निर्माण करण्यासाठी केंद्राकडून निधी दिला जातो. त्या निधीच्या माध्यमातून तेथील शासनाचे क्रीडा विभाग उत्कृष्ट दर्जाचे आयोजन करतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धांना ज्या प्रकारचे निवासस्थान, भोजन, वाहनव्यवस्था, पदके, उद्घाटन, समारोप, खेळाडंचे ट्रॅकसूट, बूट, टी-शर्ट, क्रीडासाहित्य इत्यादी, हे सर्व त्या निधीतून खर्च केला जातो. यामुळे या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांचा अनुभव मिळण्यास मदत होते. त्यांचे मनोबल, जिद्द, आत्मविश्वास वाढतो. खेळाडूंबरोबर तज्ज्ञ मार्गदर्शकांनासुद्धा आंतरराष्ट्रीय मार्गदर्शकांकडून पुढील अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जात आहे.
खेला इंडियाच्या अंतर्गत महाराष्ट्राच्या खेळाडूंना नक्कीच फायदा झाला आहे. जे खेळाडू पदकविजेते आहेत त्यांना शिष्यवृत्ती सुरू झाल्या आहेत. काहींची निवड खेलो इंडिया कोचिंग सेंटरमध्ये झाली आहे. याचा फायदा नक्कीच महाराष्ट्रातील खेळाडूंना होत आहे. आॅलिम्पिक, आशियाई क्रीडा स्पर्धा, जागतिक क्रीडा स्पर्धा अशा महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होेऊन महाराष्ट्रासह आपल्या देशाचे नावलौकिक करण्याचे स्वप्न पूर्ण होणार, हे नक्की. विविध खेळांचे खेळाडू, मार्गदर्शक आणि संघटक त्यासाठी प्रयत्नशील आहेत. खाशाबा जाधव यांनी १९५२ मध्ये हेलसिंकी आॅलिम्पिक स्पर्धेत भारताला कांस्यपदक जिंकून दिले होते. महाराष्ट्रातील खेळाडूंनी चांगली कामगिरी करून आॅलिम्पिकपदक जिंकावे हे त्यांचे स्वप्न पूर्ण होईल.
केंद्राच्या क्रीडा विभागाकडून खेलो इंडिया या स्पर्धेचे आयोजन केले जात आहे. पहिल्या स्पर्धेत त्यांनी १७ वर्षांखालील मुला-मुलींंचा वयोगट ठेवला होता. त्यामध्ये अॅथलेटिक्स, आर्चरी, शूटिंग, जलतरण, बास्केटबॉल, बॉक्सिंग, फुटबॉल, हॉकी, जिम्नॅस्टिक, ज्युदो, खो-खो, वेटलिफ्टिंग, कुस्ती, बॅडमिंटन, व्हॉलीबॉल व कबड्डी या १६ खेळांचा समवेश होता. या स्पर्धेची पहिली स्पर्धा नवी दिल्ली येथे, दुसरी पुण्यात म्हाळुंगे-बालेवाडी शिवछत्रपती क्रीडा संकुलात, तिसरी गुवाहाटी आणि चौथी गेल्या महिन्यात हरियाना येथे झाली. गेल्या वर्षीपासून या स्पर्धेचे दोन भागात गट करण्यात आले. एक शालेय व दुसरा महाविद्यालयीन गेल्या चार स्पर्धांंमध्ये महाराष्ट्राच्या खेळाडूंनी दोन्ही गटांत निर्विवाद वर्चस्व राखले. सुवर्ण, रौप्य व कांस्यपदकांची लयलूट केली.
विविध योजनांसाठी केंद्राकडून मंजूर निधी
२०१७-१८ : ५८७.७८५ कोटी
२०१९-२० : ७५७. ०९१ कोटी
२०२१-२२ : १,०५१.७०३ कोटी
– दरवर्षी १ हजार उत्कृष्ट खेळाडूंना वार्षिक ५ लाख रुपये शिष्यवृत्ती दिली जात आहे.
– प्रशिक्षण केंद्रावर जे विविध खेळांचे मार्गदर्शक जे अॅकॅडमीमध्ये मार्गदर्शन
– करतात त्यांना त्यांच्या श्रेणीनुसार मानधन दिले जात आहे.
– खेलो इंडिया निवासी अॅकॅडमी
– श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल : ज्युदो, सायकलिंग, अॅथलेटिक्स,
– रायगड; ला व्हॉलीबॉल
– औरंगाबाद : फेन्सिंगच्या (तलवारबाजी)
– राज्यातील सर्व जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय अंतर्गत विविध खेळांच्या अनिवासी अॅकॅडमी