ताज्या बातम्यारणधुमाळी

बंडखोर आमदारांना खोके मिळाले का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा खुलासा

मुंबई | CM Eknath Shinde On Sanjay Raut – सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर आहेत. ते अनेक वरीष्ठ राजकीय नेतेमंडळींच्या भेटीगाठी घेत आहेत. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क सुरू झाले आहेत. तसंच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाशिकमध्ये बोलताना शिंदे गटावर खोचक शब्दांत टीका केली आहे. “शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना 50 खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरू होतील,” असं संजय राऊत म्हणाले होते. दरम्यान राऊतांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोला लगावला आहे. दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

संजय राऊत यांनी नाशिक दौऱ्यादरम्यान शिवसेना पदाधिकारी-कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना शिंदे गटावर निशाणा साधला. शिवसैनिकाला कोणी पळवून नेऊ शकत नाही. 40 आमदार म्हणजे शिवसेना नाही. 100 आमदार आणि 25 खासदार परत निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. त्यांना 50 खोके पचणार नाहीत. थोड्या दिवसात सगळ्यांना जुलाब सुरू होतील. शिवसेनेसोबत बेईमानी करणे सोपे काम नाही. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे”, असं संजय राऊत म्हणाले होते.

यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना पत्रकार परिषदेत विचारणा केल्यानंतर त्यावर त्यांनी खोचक शब्दांत टीका केली आहे. “फक्त 50? पण 50 खोके कसले? मिठाईचे की अजून कसले? असा प्रश्न विचारत शिंदेंनी टोला लगावला. एखादा ग्रामपंचायत सदस्यही इकडून तिकडे जायला चार वेळा विचार करतो. हे 3-4 लाख लोकांमधून निवडून आलेले आमदार आहेत. आम्ही सभागृहात सावरकारांच्या बाबतीत बोलू शकत नव्हतो. अनेक मुद्द्यांवर तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत होता. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की अन्यायाविरोधात पेटून उठा. आमचं हे बंड नाहीये, हा पक्षातला मोठा उठाव आहे. हे सगळे स्वेच्छेने आलेले आहेत. ते पैशाने विकले जाणारे नाहीयेत. त्यांना आता दुसरं काहीच नाहीये आरोप करायला. ते करत बसतील”, असं देखील एकनाथ शिंदे म्हणाले.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये