पुणेराष्ट्रसंचार कनेक्टसिटी अपडेट्स

मनपाच्या पथ विभागाचा कारभार चव्हाट्यावर…!

रस्ते धोकादायक : समन्वयाचा अभाव अधिक

निकृष्ट कामाच्या दर्जामुळे नागरिकांना मनस्ताप…

आठवडाभरापासून संततधार पावसामुळे अवघ्या चार-पाच महिन्यांपूर्वी केलेले रस्ते उखडण्यास सुरुवात झाली आहे. निकृष्ट कामाचे परिणाम करदात्या पुणेकरांनाच भोगावे लागत असून, हादरे बसून कंबरडे मोडण्याची वेळ आली आहे. समान पातळी नसल्याने रस्त्यात जमा होणार्‍या पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यातच रस्त्यांवर पसरलेल्या खडीमुळे अपघाताचा धोकाही निर्माण झाला आहे.

पुणे : मागील आठ ते दहा दिवसांपासून शहरात पावसाचा जोर वाढला आहे. पावसामुळे शहरातील रस्त्यांच्या निकृष्ट दर्जाच्या कामाचे दर्शन होण्यास सुरुवात झाली आहे. अवघ्या काही महिन्यांपूर्वी जेथे डांबरीकरण केले होते, त्यावरील खडी निघून जात आहे. रस्त्याच्या मध्यभागी खड्डे पडून त्यांत पाणी भरत असल्याने वाहनचालकांची तारांबळ उडत आहे, तर रस्ते खोदल्यानंतर सिमेंट काँक्रिट टाकून खड्डे बुजविण्यात आले. पण त्यावरही खड्डे पडल्याने रस्ते धोकादायक झाले आहेत. रस्ते खड्डे देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या पथ विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

रस्ते खड्ड्याच्या डागडुजीवर लाखाचा खर्चही करण्यात आला आहे. तरीही रस्ते खड्ड्याची दयनीय अवस्था झाल्याने महापालिकेच्या पथ विभागाचा कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असल्याचे दिसून येत आहे. यापुढील तीन महिने पावसाळा असल्याने रस्त्यांची स्थिती यापेक्षा भयंकर होण्याची चिन्हे आहेत.

शहरात गेल्या वर्षभरापासून जलवाहिनी, मलवाहिनी टाकण्यासाठी शेकडो किलोमीटरचे रस्ते खोदण्यात आले. मोबाईल, इंटरनेट कंपन्यांच्या केबल, विद्युतवाहिनी टाकण्यासाठीही मोठ्या प्रमाणात रस्ते खोदण्यात आले. एकाच वेळी शहराच्या सर्व भागांत सुरू असलेल्या खोदकामामुळे एकही रस्ता धड राहिला नाही. मध्यवर्ती पेठांसह उपनगरांमधील नागरिकांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे. महापालिका आयुक्तांनी पावसाळ्यापूर्वी रस्तेखोदाई थांबवून सर्व रस्ते पूर्ववत करा, असे आदेश पथ विभागाला दिले. पाणीपुरवठा विभागाकडून जेथे जलवाहिनी टाकली जाते, तेथे त्यांच्याकडूनच रस्ता दुरुस्त केला जातो. पण हे काम करताना पाणीपुरवठा व पथ विभाग यांच्यामध्ये समन्वय नव्हता. पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनी टाकल्यानंतर त्या कामात दर्जा नसल्याने अनेक ठिकाणी सिमेंट काँक्रिट टाकलेला भाग खचला आहे, तर काही ठिकाणी खड्डे पडले आहेत.

वाघोली रोड, नदीपात्र, बंडगार्डन रस्ता, पुणे कॅम्प भाग, सिंहगड रस्ता, चतुःशृंगी, रेंजहिल कॉर्नर, खडकी स्टेशन, ब्रेमेन चौक, सेनापती बापट रस्ता, वडारवाडी, नीलज्योती, येरवडा, खराडी, कात्रज-कोंढवा रस्ता, बिबवेवाडी, हडपसर, वानवडी, धायरी, कोरेगाव पार्क, सोलापूर रस्ता, मुंढवा रस्ता यांसह इतर भागांत मुख्य रस्त्यांसह लहान रस्त्यांना खड्डे पडले आहेत, तर अनेक ठिकाणी हळूहळू खडी निघून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. याबाबत वेळीच उपाययोजना न केल्यास भविष्यात शहरातील रस्ते खड्ड्यात जाणार असल्याची शक्यता जास्त आहे.

नव्या जलवाहिन्या, मलनिस्सारण वाहिन्या, देखभाल-दुरुस्ती यांसाठी रस्ते खोदावे लागले आहेत. ते आता काम पूर्ण झाले आहे. शहरातील जवळपास साडेपाच हजार छोटे – मोठे खड्डे बुजविण्यात आले आहेत. चालू पावसामध्ये खड्डे रस्ते डांबर टाकून तयार करता येत नाहीत, तरीपण त्यासाठी खास टीम तयार केली आहे. – विजय कुलकर्णी मुख्य अभियंता (पथ विभाग, मनपा )

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये