भारतात ‘मंकी पॉक्स’चा पहिला रुग्ण; संपर्कात आलेल्यांचा शोध सुरु

तिरुअनंतपुरम : विषाणूजन्य झुनोसिस (प्राण्यांमधून मानवांमध्ये पसरलेला विषाणू) असलेल्या मंकी पॉक्सने जगभरातील लोकांना घरून टाकलेले आहे. कोरोना महामारीतून बाहेर पडतो न पडतो तर मंकी पॉक्स या नवीन विषाणूने जगभरातील लोकांच्या मनात भीती भरवून ठेवली आहे. जगातील अनेक देशांत मंकी पॉक्सने थैमान माजवले आहे. त्यामुळे भारताच्या आरोग्य विभागाकडून याची योग्य दखल घेतली जात आहे.
दरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. मंकी पॉक्सची लक्षणे असणारा पहिला रुग्ण भारतात सापडला आहे. केरळ मधील 35 वर्षीय पुरुषात मंकी पॉक्सची लक्षणे आढळली आहेत. त्याच्या पुष्टीसाठी सॅम्पल पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीकडे पाठवण्यात आले आहेत.
केरळच्या आरोग्यमंत्र्यांनी याबाबतची माहिती दिली आहे. मंकी पॉक्स सारखी लक्षणे आढळल्याने रुग्णाचे सॅम्पल घेण्यात आले असून ते टेस्टसाठी पाठविण्यात आले आहेत. रुग्णाची प्रकृती स्थिर असल्याचेही त्यांनी सांगितले आहे. त्याचबरोबर रुग्णाच्या संपर्कात त्याच्या पालकांचा समावेश आहे, ज्यांना वेगळे ठेवण्यात आले आहे. तो केरळला परतला त्या फ्लाइटमधील तब्बल 11 प्रवासीही निरीक्षणाखाली आहेत. अशी माहिती देखील आरोग्य मंत्र्यांनी दिली आहे.