“शिवसेना फोडण्यामागे शरद पवार आणि अजित पवार”

मुंबई – शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांची शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षातून हकालपट्टी केली आहे. त्यानंतर माध्यमांसमोर येत रामदास कदम यांनी आपली नाराजी व्यक्त केली. त्यासोबतच शिवसेना फोडण्यामागे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार असल्याचा आरोप कदम यांनी केला आहे.
शिवसेना पक्षप्रमुख दि. बाळासाहेब ठाकरे यांनी माझी पक्षनेतेपदी निवड केली होती. आयुष्यातील 52 वर्षे शिवसेना पक्ष वाढवण्यात घातली परंतु तरीसुद्धा एखाद्या नेत्यावर राजीनामा देण्याची वेळ येते, याचा विचार करून आपण याचं आत्मपरीक्षण करावं, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, शिंदे गटाने शिवसेना फोडली, परंतु त्यामागील खरे सूत्रधार भाजपा आहे. भाजपाच्या मनात 2019 ला सत्तेबाहेर राहावं लागल्याचा राग आहे. त्या रागातूनच भाजपने शिवसेना पक्ष फोडला असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी कदम यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.