राष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

पर्यावरणाची काळजी कोण घेणार?

वाढत्या पर्यटकांमुळे हिमालय असुरक्षित

मधुरा कुलकर्णी

‘स्वच्छ भारत मिशन’च्या धर्तीवर या मोहिमेचं आयोजन करण्यात येत आहे. धार्मिक यात्रेत ‘शून्य कचरा’ कार्यक्रम बनवण्याचं काम देशात प्रथमच होत आहे. निसर्ग, वनस्पती, पर्वत, हिमनद्या आणि नद्या यांचं संरक्षण करणं, त्याच वेळी ते एक आदर्श तीर्थक्षेत्र बनवणं हा या अभियानाचा उद्देश आहे.

हिमालयीन प्रदेशात संशोधन करणाऱ्या गढवाल केंद्रीय विद्यापीठाच्या भूगोल विभागाचे प्रमुख एम. एस. नेगी यांच्या मते केदारनाथमधला वाढता कचरा धोकादायक आहे. पर्यटकांमुळे निर्माण होणारा कचरा हा चिंतेचा विषय आहे. अमरनाथ यात्रा हंगामादरम्यान महानगरपालिकेच्या घनकचरा निर्मितीवरील अभ्यासात नमूद केलं आहे की, पहलगाममधली हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्‌‍स एकूण कचऱ्यापैकी ७४ टक्के कचरा निर्माण करतात. त्यामुळे यंदा आठशे ते एक हजार टन कचरा निर्माण होण्याचा अंदाज आहे. यात्रा सुरू झाल्यानंतर अवघ्या १५ दिवसांत चारधाम रस्त्यावर यात्रेकरूंनी कचऱ्याचे ढीग निर्माण केले आहेत. त्याच्या पर्यावरणीय परिणामांबाबत विविध विभाग चिंतेत आहेत.


या वर्षी यात्रेच्या सुरुवातीपासूनच आठ लाखांहून अधिक भाविक चारधामवर पोहोचले आहेत. सुमारे १० लाख लोक येणं बाकी आहे. पर्यटकांवर लक्ष ठेवण्यासाठी आवश्यक धोरण राबवणाऱ्या काठमांडूच्या ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटन डेव्हलपमेंट’चे महासंचालक डेव्हिड मोल्डन म्हणतात, नीती आणि नियम बनवण्यात सरकारची महत्त्वाची भूमिका असते. या नाजूक पर्यावरणातल्या पर्यटकांच्या संख्येवर लक्ष ठेवण्यासाठी, शाश्वत ‘इको-टूरिझम’ तसंच स्थानिक व्यवसायाला चालना देण्यासाठी स्थानिक आणि राष्ट्रीय स्तरावर धोरण तयार करण्याची गरज आहे. जम्मू विद्यापीठातल्या भूगोल विभागाचे माजी प्राध्यापक एम. एन. कौल म्हणतात की, या विषयावर वैज्ञानिक दृष्टिकोनातून अधिक अभ्यास आवश्यक आहे. अमरनाथ इथल्या बर्फाच्या लिंगाच्या आकारात बदल होण्याला ‘लिंगम’कडे जाणाऱ्या जलमार्गातील बदल कारणीभूत असू शकतो. ही गुहा चुनखडी आणि जिप्समपासून बनली आहे. पर्यटकांद्वारे निर्माण होणारी उष्णता स्टॅलेग्माइटच्या आकारावर परिणाम करते. यात्रेकरूंच्या वाहतुकीव्यतिरिक्त, पर्वत मोहिमांमुळे हिमनद्यांचा, पर्यायाने पर्यावरणाचा ऱ्हास होतो. हा ऱ्हास मानवी श्वास, कचरा आणि जमिनीची धूप यांचा परिणाम आहे. चारधाम यात्रेसाठी भाविक मोठ्या संख्येने येत असल्यामुळे तज्ज्ञांनी पर्यावरणाबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. नामशेष होत असलेल्या वनौषधींचा धोका अधिक असल्याचं त्यांचं म्हणणं आहे.


जम्मू-काश्मीरमध्ये पर्यटन वाढल्याने चारधाम यात्रेत केदारनाथच्या मार्गावर प्लॅस्टिक कचरा आणि त्याचे ढीग दिसू लागले आहेत. ‘हायर प्लांट हिमालयन रिसर्च इन्स्टिट्यूट’ (एचएपीआरईसी)चे संचालक प्रोफेसर एम. सी. नौटियाल म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून लोकांची केदारनाथकडे ये-जा वाढली आहे. त्याचबरोबर कचऱ्याच्या ढिगाऱ्यांमुळे केदारनाथ परिसरातल्या मौल्यवान वनौषधी नष्ट होत आहेत. जटामासी, आतिश, बरमाळा, काकोळी यासह काही प्रमुख औषधी वनस्पती नामशेष झाल्या आहेत. हे सर्व तीव्र हवामान बदलामुळे होत आहे. या प्रदेशात मानवी हस्तक्षेप वाढत आहे. जम्मू-काश्मीर सरकारने अमरनाथ यात्रेदरम्यान कचरा साफ करण्यासाठी इंदूर आयआयटीच्या ‘स्वाह’ या स्टार्टअपशी हातमिळवणी केली आहे. अहवालानुसार, या प्रवासादरम्यान एक हजार टनांपेक्षा जास्त कचरा निर्माण होत असल्याचा अंदाज आहे. याबाबत तज्ज्ञ चिंतेत आहेत. ताज्या स्वच्छता अभियानात इंदूरमधल्या सुमारे ३५० लोकांनी स्वेच्छेने सहभाग नोंदवला. अमरनाथ यात्रेदरम्यान प्लॅस्टिक आणि डिस्पोजेबल साहित्याचा वापर न करण्याच्या सूचना सरकारने दिल्या आहेत. ‘स्वाहा’ने शून्य ‘लँडफिल इव्हेंट’ सादर केला आहे. या अंतर्गत इथे निर्माण होणारा सर्व कचरा पारंपरिक पद्धतीनं जमिनीखाली टाकण्याऐवजी पुनर्वापर केला जाणार आहे.

यासोबतच त्यातून सेंद्रिय खतंही बनवली जाणार असून ती प्रवाशांना भेट म्हणून दिली जाणार आहेत.‘स्वाह’च्या स्वयंसेवकांनी कचरा व्यवस्थापन यंत्रं आणि उपकरणं बसवण्यास सुरुवात केली आहे. तसंच शिबिरं, लंगर, दुकानं आणि इतर उपक्रमांमधून निर्माण होणारा कचरा गोळा करण्यासाठी ‘स्वाह’ची टीम यात्रेच्या समाप्तीपर्यंत म्हणजेच ११ ऑगस्टपर्यंत तैनात असेल. जम्मू-काश्मीरच्या ग्रामीण विकास विभागानेही कचरामुक्त तीर्थयात्रा मोहीम सुरू केली आहे. ‘स्वच्छ भारत मिशन’च्या धर्तीवर या मोहिमेचं आयोजन करण्यात येत आहे. धार्मिक यात्रेत ‘शून्य कचरा’ कार्यक्रम बनवण्याचं काम देशात प्रथमच होत आहे. निसर्ग, वनस्पती, पर्वत, हिमनद्या आणि नद्या यांचं संरक्षण करणं, त्याच वेळी ते एक आदर्श तीर्थक्षेत्र बनवणं हा या अभियानाचा उद्देश आहे. (उत्तरार्ध)

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये