खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शेकडो शिवसैनिकांचा मोर्चा, पोलीस बंदोबस्त तैनात

कोल्हापूर | Shivsena Morcha Against MP Dhairyasheel Mane – आज (सोमवार) बंडखोर खासदार धैर्यशील मानेंच्या घरावर शेकडो शिवसैनिकांचा मार्चा धडकला आहे. पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी गद्दारी करणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिक व मतदारांच्या भावनांचा अपमान केला असून त्यांच्या कोल्हापूर येथील कार्यालय आणि घरावर धडक मोर्चा काढणार असल्याचं जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी स्पष्ट केलं होतं. त्यामुळे पोलिसांकडून खबरदारीचा उपाय म्हणून खासदार धैर्यशील यांच्या घराकडे जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
तब्बल 400 हून अधिक पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी 400 मीटर अंतरावर शिवसैनिकांचा मोर्चा रोखला आहे. मात्र, शिवसैनिक अजूनही धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्यास आक्रमक आहेत. शिवसैनिक धैर्यशील मानेंच्या घराकडे जाण्याच्या भूमिकेवर ठाम राहिल्यानंतर पोलिसांनी शिवसेनेच्या तिन्ही जिल्हाप्रमुखांना ताब्यात घेतलं आहे. यावेळी काही काळ शिवसैनिकांची पोलिसांशी झटापट झाली. तसंच पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शिवसेना जिल्हाप्रमुखांची बाजू समजून घेणार असल्याचं म्हटलं आहे.
धैर्यशील माने यांना प्रवक्ता पदासह सर्वकाही देऊनही त्यांनी कुटुंबाशी गद्दारी केली आहे. याचा जाब विचारण्यासाठी त्यांच्या घरावर व कार्यालयावर मोर्चा काढणार आहे, अशी माहिती जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी दिली होती. खासदार माने हे शिंदे गटात गेले असल्याने कोल्हापुरातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. शिवसेनेकडून पद मिळूनही मानेंनी हा निर्णय का घेतला? असा सवाल आंदोलकांनी केला आहे. त्यामुळे खासदार माने जवाब दो, अशा घोषणाही यावेळी आंदोलकांकडून देण्यात आल्या आहेत.