“बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली…”, संजय राऊतांचा हल्लाबोल

मुंबई | Sanjay Raut On Rebel Mla’s – सध्या राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या 40 आमदारांना घेऊन बंड केलं होतं. त्यानंतर 12 खासदारही शिंदे गटात सामील झाले आहेत. तसंच शिंदे-फडणवीस सरकार राज्यात स्थापन झाल्यापासून अनेक घडामोडी घडताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट आणि बंडखोरांवर पुन्हा एकदा टीका केली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली. माणसांचे सरदार केले. याच सरदाराने शिवसेनेवर घाव घातले, असं संजय राऊत म्हणाले आहेत. ते टीव्ही 9 मराठीशी बोलत होते.
“चुका सगळीकडेच होत असतात. चुका कुटुंबात, व्यापारात, धंद्यात होतात. राजकारणातही होत असतील. जे प्रश्न विचारत आहेत ते नगरसेवक पदापासून ते मंत्रिपदापर्यंत, दिल्लीपर्यंत पोहोचले आहेत. मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचा चार ते पाच वेळा अध्यक्ष होणं ही साधी गोष्ट नाही. यातूनच तुम्हाला बळ मिळाले आहे. यातूनच तुमची लालसा वाढली आहे. याच लालसेतून हा घाव घातलेला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी माकडांची माणसं केली. माणसांचे सरदार केले. याच सरदाराने शिवसेनेवर घाव घातले,” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
पुढे संजय राऊत म्हणाले, “आपण ज्याच्यावर जास्त विश्वास ठेवतो तोच विश्वासघात करतो. विश्वासघात झाला म्हणजे विश्वास ठेवणे सोडून देता येत नाही. काम करताना सहकाऱ्यांवर, कुटुंबातील सदस्यांवर विश्वास ठेवावा लागतो. त्याशिवाय कुटुंब पुढे जात नाही. ज्याच्यावर आपण विश्वास टाकलेला आहे त्याच्या अंतरंगात काय सुरु आहे, हे आपल्याला समजत नाही. जोपर्यंत स्वार्थ आहे, तोपर्यंत विश्वासघात सुरुच राहील.”