डॉ. देगलूरकरांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार

पुणे : महाराष्ट्र कीर्ती सौरभ प्रतिष्ठानतर्फे मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. ब.देगलूरकर यांना शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे पुरस्कार जाहीर झाला आहे. एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे जन्मशताब्दी वर्षाचा समारोप आणि तिथीनुसार जन्मदिनाची पूर्वसंध्या असे दुहेरी औचित्य साधून १ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे सायंकाळी साडेपाच वाजता होणार्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
याच कार्यक्रमात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते इतिहास अभ्यासक संदीप तिखे यांना श्रीमंत बळवंत मोश्वर पुरंदरे शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येणार आहे. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविणार असून, माजी महापौर मुरलीधर मोहोळ यावेळी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती प्रतिष्ठानचे विश्वस्त अभिषेक जाधव आणि राधा पुरंद-आगाशे यांनी दिली.