‘सामना’ची लेखणी आणि शिवसेनेचा ‘आवाज’ 4 ऑगस्ट पर्यंत जेरबंद!

मुंबई : रविवार (दि. 31) रोजी मध्य राञीपासून ईडीच्या ताब्यात असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना आज झालेल्या न्यायालयीन कारवाईत ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीकडून ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद करताना संजय राऊतांनी ईडीला सगळ्या गोष्टीत सहकार्य केलं. यावेळी ८ दिवसांच्या ईडी कोठडीची गरज काय?, असा सवाल उपस्थित केला.
जोरदार झालेल्या युक्तीवादानंतर कोर्टाने ईडीची विनंती अमान्य करत ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावली. राऊतांना हृदयविकाराचा त्रास असल्याने रात्री साडे दहा नंतर राऊतांची चौकशी करण्यास कोर्टाने मज्जाव केला आहे. दुसरीकडे पत्राचाळ घोटाळ्यात प्रवीण राऊत केवळ मोहरा होता. या घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार संजय राऊत हेच असल्याचे ईडीच्या वकिलांनी ठासून सांगितले.
संजय राऊत यांच्या तीन दिवसांच्या ईडी कोठडीमुळे आता प्रत्येक दिवशी शिवसेनेची बाजू कोण मांडणार? असा सवाल उपस्थित झाला आहे. या निमित्ताने सामनाची धारदार लेखणी आणि शिवसेनेचा आवाज 4 ऑगस्टपर्यंत बंद होणार का हे देखील महत्त्वाचे ठरणार आहे.