“या पोराला काही शिकवलंय की नाही?” ‘झाडी डोंगार’वाले शहाजी पाटलांचा ठाकरेंवर हल्लाबोल!
मुंबई : (Shahaji Patil On Aditya Thackeray) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना पक्षात उभी फूट पडली आहे. शिवसेना पक्ष शिंदे समर्थकांमध्ये विभागला गेला आहे. दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्याकडून बंडखोरांना सातत्यांने लक्ष्य केले जात आहे. शिंदे गटातील आमदार गद्दार असल्याचा आरोप केला जातोय. याच टीकेला बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील म्हणाले, आदित्य ठाकरे यांच्यावर काही संस्कार केलेले आहेत की नाही? की लहानपणी ते गल्लीबोळात फिरत होते, असी खरमरीत टोला त्यांनी यावेळी लगावला.
आदित्य ठाकरेंसारख्या लहान पोराने असे बोलणे चुकीचे आहे. सर्व आमदारांचे वय ५० वर्षांपेक्षा जास्त आहे. आपण आपल्या घरात वडीलधाऱ्यांना आदराने, सन्मानाने बोलतो. हा संस्कार आपल्याला आईने बालपणी दिलेला असतो. या पोराला काय शिकवलंय ते समजत नाही. हे पोरगं बाहेर गल्लीत हिंडत होतं, हेही समजत नाही, असही पाटील म्हणाले.
आदित्य ठाकरेंना ही भाषा अजिबात शोभत नाही. ठाकरी भाषा फक्त बाळासाहेब ठाकरेंची होती. ही भाषा उद्धव ठाकरेंची तसेच आदित्य ठाकरेंचीही नाही. कुठल्याही नेतृत्वाने जनतेसमोर जाताना उपजत गुणांना घेऊन जावे, अनुकरण नको. अनुकरण करणारे नेतृत्व टिकलेले नाही. तसेच ते लोकांना आवडतही नाही. तुम्हाला बाळासाहेबांचा वारसा आहे. त्यामुळे तुम्हाला हा सन्मान मिळाला आहे, असेही शहाजीबापू पाटील यांनी आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्ला चढवला.