“राजकारणासाठी डायलाॅगबाजी…”, अजित पवारांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं प्रत्युत्तर
मुंबई | Devendra Fadnavis On Ajit Pawar – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाणा साधला आहे. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचीही गरज नाही. त्या दोघांनीही घरी बसलं पाहिजे अशी टीका अजित पवार यांनी केली होती. तसंच मंत्रीमंडळ जाहीर झाल्यानंतर संभाव्य नाराज आमदार फुटून बाहेर पडतील, याची भीती मुख्यमंत्र्यांना असावी असा दावाही अजित पवारांनी केला. यावर आता देवेंद्र फडणवीस यांनी पवारांना प्रत्युत्तर दिलं आहे. ते दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
“माहिती असतानाही फक्त राजकारणासाठी डायलॉगबाजी केली जाते. गेल्या सरकारमध्ये अनेक सचिवांना अधिकार होते. त्याआधीही आमच्या सरकारमध्ये अनेक मंत्र्यांनी सचिवांना हे अधिकार दिले होते. महाराष्ट्रात नव्हेत देशात ही पंरपरा आहे. सरकार जनतेचं असून, जनेतेचे मुख्यमंत्री आहेत. जनताच महाराष्ट्रात निर्णय घेईल,” असं फडणवीस म्हणाले आहेत.
“कालच मुख्यमंत्र्यांनी विस्तार लवकर होईल असं स्पष्ट सांगितलं आहे. मी तर म्हणतो त्यापेक्षाही लवकर होईल. सुप्रीम कोर्टाने मंत्रीमंडळ विस्तार करु नका असं सांगितलेलं नाही. सुनावणीचा आणि त्याचा काहीही संबंध नाही,” असं देखील फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.