बौद्धिक विकासाची पहिली पायरी

अशोक सोनवणे
मागील लेखामध्ये आपण मेंदू विकासाचे चार टप्पे कोणते आहेत ते पाहिलेले आहे. कोणत्या टप्प्यामध्ये मेंदूचा विकास कसा होतो? न्यूरॉन्सच्या जोडण्या कशा होतात? मुलांचा सवयी, क्षमता, स्वभाव, व्यक्तिमत्त्व कसे आकाराला येत असते, बुद्धिमत्ता कशी विकसित होते, हे थोडक्यात पाहिलेले आहे. तसे पाहता मेंदूविकासाचे टप्पे ही वरवरची संकल्पना आहे. आता थोडंसं डिटेलमध्ये पाहूया. थोडक्यात बौद्धिक विकासाच्या पायऱ्या कोणत्या आहेत ते पाहूया.
आपल्या मानसिकतेचा परिणाम आपल्या कामावर पडत असतो. आपली मानसिकता खूप पॉझिटिव्ह असेल, आत्मविश्वास भरभरून असेल तर कठीण असणारी कामे सोपी होतात. याउलट आपली मानसिकता निगेटिव्ह असेल, मानसिक त्रास, आळस, इच्छा नसेल तर सोपी कामेसुद्धा कठीण होतात. म्हणजेच आपली मानसिकता ही आपल्या कामाची गती आणि दर्जा ठरवितात. मग बौद्धिक विकासाच्या मानसिकता किंवा पायऱ्या कोणत्या आहेत ते पाहूया.
बौद्धिक विकासाची पहिली पायरी ‘गरज’ ही आहे. अर्थशास्त्रात एक गरजेचा सिद्धांत आहे. “ज्या वस्तूची गरज जास्त असते, तितकी त्या वस्तूची मागणी जास्त असते. ज्या वस्तूची मागणी जास्त असते त्या वस्तूचे मूल्यसुद्धा जास्त असते.” हाच नियम बौद्धिक विकासाला लागू पडतो. मुलांना जितकी गरज जास्त असेल तितके ती गरज पूर्ण करण्यासाठी प्रत्येक मूल प्रयत्न करीत असते. मूल जितके जास्त प्रयत्न करील तितक्या जास्त मेंदूमध्ये न्यूरॉन्सच्या जोडण्या होतात. जितक्या जास्त न्यूरॉन्सच्या जोडण्या होतात तितका जास्त बौद्धिक विकास होत असतो. गरज ही शोधाची जननी आहे, असे म्हणतात.
मुलांना गरज निर्माण झाली, की ती गरज पूर्ण करण्यासाठी नवनवीन कल्पना मुलं करतात. अनेक नवीन पद्धतींचा शोध लावतात. सातत्याने वेगवेगळे प्रयत्न करतात. यातूनच मुलांच्या मेंदूमधील न्यूरॉन्सच्या जोडण्या होतात आणि बौद्धिक विकास जास्त होतो. निसर्गतः प्रत्येक मुलामध्ये सतत नवीन शिकणे, विविध कृती करीत राहणे, प्रत्येक कृतीमधून आनंद मिळविणे आणि त्यातून बौद्धिक विकास होणे ही मेंदूची गरज असते. परंतु पालक खरंच आपल्या मुलामध्ये गरज निर्माण होऊ देतात का? गरज पूर्ण करण्यासाठी मुलांनी विविध कल्पना कराव्यात, विविध प्रयत्न करावेत, यासाठी पालक प्रयत्न करतात का? माझ्या मते पालकच मुलामध्ये गरज निर्माण होऊ देत नाहीत, चांगली शाळा, क्लास, चांगल्या भौतिक सुविधा, कोणतीही गोष्ट संपण्याच्या आधीच उपलब्ध असते, अशा वातावरणामुळे मुलांमध्ये गरजच निर्माण होत नाही. मुलांना सतत मार्गदर्शन केले, वारंवार सूचना केल्या, रागावून कृती करून घेतल्या तरीसुद्धा मुलांमधील गरज संपून जाते, सध्या मुलं शाळेची तयारी स्वतःहून करीत नाहीत, अभ्यास, होमवर्क, स्वतःची तयारी इतकेच नव्हे, तर जेवणसुद्धा स्वतःहून करीत नाहीत, याच्यामागील कारण हे पालकांनी मुलांची गरज संपवलेली आहे.