कोरोना नंतर ‘लांग्या व्हायरस’ ने वाढवली जगाची चिंता; काय आहे हा चायनीज व्हायरस?

नवी दिल्ली : मागील दोन वर्षे संपूर्ण जग कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे अगदी थांबलं होतं. त्या दोन वर्षांच्या काळात सर्वच देशांची आणि नागरिकांची अवस्था झाली होती ती आपण जवळून अनुभवली. दरम्यान, कोरोन विषाणू हा चीन मधून प्रसारित झाल्याचंही निष्पन्न झालं होतं. त्यावरून चीनला जागतिक पातळीवर विचारणा देखील करण्यात आली होती. मात्र, आता कुठे जग कोरोनामुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटांतून बाहेर पडत असताना अशातच चीनने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे.
चीनमध्ये लांग्या नावाच्या व्हायरसने मोठ्या प्रमाणात लोकांची चिंता वाढवली आहे. लांग्या हेनिपाव्हायरसचे (Langya Henipavirus) चीनमध्ये ३५ रुग्ण सापडले आहेत. हा व्हायरस २०१८ मध्येच आढळल्याची माहिती आहे. मात्र, काही दिवसांपूर्वी याची अधिकृतपणे नोंद करण्यात आली आहे.
अशी आहेत लक्षणे
चीन मधील ज्या रुग्णांना लांग्याची लागण झाली आहे त्यात बहुतांश शेतकरी आहेत. त्यांच्या घशातून घेतलेल्या नमुन्यांच्या चाचणीत हा विषाणू आढळून आला आहे. लागण झालेल्या रुग्णांना थकवा, खोकला, भूक न लागणे, वेदना होणे अशी लक्षणे आढळून आली आहेत. तर काहींमध्ये यकृत, मूत्रपिंड खराब होण्याचीही लक्षणे आढळल्याची माहिती आहे. हा विषाणू मुख्यतः प्राण्यांमध्ये आढळतो. प्राण्यांमधून मानवामध्ये त्याचे संक्रमण झाल्याचे सांगितले जात आहे.