वाद्यवृंदाने जिंकले उपस्थितांचे मन

बावधन: ‘वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत भारतवासीयांचा स्फूर्तिमंत्र आहे. या गीताचे बोल कानावर पडताच चैतन्य संचारते. पवित्र भारतमातेला, भारताच्या उज्ज्वल इतिहासाला वंदन करणारा हा मंत्र आहे,’ असे मत ज्येष्ठ नागरिक नीलकंठ बजाज यांनी व्यक्त केले.
येथील सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव उत्साहात साजरा झाला. ७६ व्या स्वातंत्र्यदिनी ‘सूर्यदत्त’च्या वाद्यवृंदाने गायलेल्या गीतांनी आणि संगीतमय वातावरणाने उपस्थितांची मने जिंकली. ‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम झाला. अफगाण स्टुडंट असोसिएशन इन इंडियाचे अध्यक्ष वाली रहेमान रहेमानी, बबनराव दगडे पाटील, ‘सूर्यदत्त’चे समूह संचालक प्रा. डॉ. शैलेश कासंडे, राजीव श्रीवास्तव, प्रशांत पितालिया, किरण राव, विद्यार्थी यांच्यासह विभागप्रमुख, पालक, इतर कर्मचारी उपस्थित होते.
वाली रहेमान रहेमानी म्हणाले, की स्वातंत्र्य हा केवळ शब्द नाही, तर तत्त्वज्ञान आहे. स्वातंत्र्याचा खरा अर्थ त्यांना विचारा जे पारतंत्र्यात आहेत; म्हणजे तुम्हाला तुमच्या स्वातंत्र्याचे महत्त्व कळेल. स्वातंत्र्यातील प्रत्येक क्षणाचा आपण आनंद घेतला पाहिजे.
सूर्यदत्त नॅशनल स्कूलच्या वतीने संचलन करण्यात आले. शाळेच्या वाद्यवृंदाने राष्ट्रगीत गायले. आर्यन जोशीने कवितावाचन केले, तर वाद्यवृंदाने देशभक्तिपर गीते सादर केली.