अग्रलेखराष्ट्रसंचार कनेक्टसंपादकीय

मलईदार काय ?

पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचाराविरोधात प्रण करायला सांगितला. भ्रष्टाचाराची मुळे खूप खोलवर गेली आहेत. ती संपवणे अवघडच नाही, तर अशक्य आहे. शाळेत ‘तळे राखी तो पाणी चाखी’ ही म्हण शिकवली जाते तेव्हा भ्रष्टाचार संपवणे अवघड आहे, हे नक्की! मात्र तो संपवण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत, हेही सत्य आहे.

महाराष्ट्र राज्यात झालेले सत्तांतर आणि त्यानंतर सुरू असलेला सत्तेच्या सारिपाटावरचा खेळ खरे तर अनाकलनीय. फुटीर कोण, बंडखोर कोण, गद्दार कोण, मूळ कोण, असली कोण आणि नकली कोण, न्यायालय कोणाला सच्चा ठरवणार कोणाला झुठा हे सगळे अद्याप गुलदस्तात आहे. मात्र राज्य कारभार चालवण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली पाहिजे यासाठी सध्या जे काही मंत्रिमंडळ स्थापन झाले आहे, ते राज्याचा कारभार चालवणार आहे. विषय पुढे आहे. कारभार चालवण्यासाठी खात्याचे जे कारभारी नेमले आहेत, त्यांच्यावर किंवा यापूर्वीही मंत्रिमंडळ स्थापन झाले, की एक विषय नेहमी चर्चेत येतो तो मलईदार खात्याचा. माध्यमांपासून सुरू होणारा हा विषय सर्वसामान्यांच्याही इतका अंगवळणी पडला आहे, की मलईदार खाते ही एकार्थी अपशब्द, आक्षेपार्ह शब्द किंवा थेट भाषेत बोलायचे तर ती शिवी आहे असे मंत्र्यांना वाटले पाहिजे. मात्र कोणताही मंत्री मलईदार खात्यावरून बोलताना दिसत नाही. राज्यातल्या जनतेचा आणि त्यांनी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींचा तो अपमान आहे असे कोणालाच वाटत नाही, हे दुर्दैव आहे.

मलईदार खाते मिळत नाही किंवा मिळाले याचा अर्थ तो मंत्री भ्रष्टाचार करतो, असा अप्रत्यक्ष आरोप केला जातो आणि तो ही मंडळी गप्प राहिल्याने त्यांना मान्य आहे असा अर्थ निघतो. खरे तर जी मंडळी काम करण्यासाठी निवडून दिली आहेत त्यांनी जनतेचे काम केले पाहिजे. त्यासाठी खातेनिहाय वर्गीकरण केले आहे. मात्र कोणते खाते मालदार आहे यावर मंत्र्यांच्या कामाचे, ज्येष्ठतेचे आणि मालदारपणाचे मूल्यमापन होत आहे. मालदार, मलईदार या शब्दाचा अर्थ काय होतो हे सर्वसामान्यांना चांगलेच माहिती आहे. प्रत्येक खाते समान महत्त्वाचे आहे. त्या खात्यासाठी अंदाजपत्रकात तरतूद कशी करून घ्यायची हे त्या खात्याच्या मंत्र्याचे काैशल्य आहे. एक उदाहरण सांगता येईल. आर. आर. पाटील यांना त्यांच्या पक्षातल्या अंतर्विरोधामुळे ग्रामविकास खाते दिले होते. आर. आर. पाटील यांनी आपल्या कौशल्याने ते खाते आणि त्यातली ग्रामस्वच्छता अभियान योजना यामुळे आपला ठसा त्या खात्यावर उमटवला. अगदी परदेशातून त्यांना या विषयावर बोलण्यासाठी बोलावणी आली. मुद्दा हा आहे, की कोणते खाते कमी महत्त्वाचे आणि नेत्यांच्या दृष्टीने कमी मलईचे नसते.

पंतप्रधान मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भ्रष्टाचाराविरोधात प्रण करायला सांगितला.भ्रष्टाचाराची मुळे खूप खोलवर गेली आहेत. ती संपवणे अवघड नाही तर अशक्य आहे.शाळेत ‘तळे राखी तो पाणी चाखी’ ही म्हण शिकवली जाते. तेव्हा भ्रष्टाचार संपवणे अवघड आहे हे नक्की! मात्र तो संपवण्यासाठी कठोर परिश्रम केले पाहिजेत हेही सत्य आहे.लाच घेणारा कोणी ही लाच घेण्याच्या मळलेल्या वाटेवरून चालण्याचा प्रयत्न करतो, नवी वाट शोधायचीही तसदी घेत नाही. त्यामुळे महसूल, अर्थ, नगरविकास ही खाती मालदार आणि संास्कृतिक, राजशिष्टाचार, संसदीय कामकाज खाती बिनमलईची हे गणित कोणी मांडले हे समजत नाही. किंबहुना या खात्यांकडे इतरांनी दुर्लक्ष करावे यासाठी ही खाती मालशून्य खाती ठरवली. मांजराने दूध डोळे मिटून पिले, तरी बाकी सगळे बघत असतात.ईडीचा धसका सामान्य माणसाला नसतो, तर ज्याच्याकडे पैसा आहे त्याला असतो.तेव्हा मालदार खाती म्हणणे म्हणजे जनतेचा अपमान, आपल्या कामाचे अवमूल्यन आणि आपल्या भ्रष्ट आचरणाला आपण दिलेली मान्यता आहे, हे समजून घ्यावे. लोकशाहीत निवडणूक जिंकणे हे अंतिम उद्दिष्ट असल्याने मलईदार व्यक्तीचे दार सदैव उघडे असते, हे पण सत्य जनतेने स्वीकारले आहे, असे म्हणावे लागेल.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये