Top 5ताज्या बातम्यापुणेमहाराष्ट्ररणधुमाळी

लोकसभा निवडणुकीत शिरुरुमध्ये कमळ फुलणार! आ. माधुरी मिसाळ यांच्‍या दाव्‍याने राजकीय वर्तुळात खळबळ

पिंपरी – Madhuri Misal – राज्‍यात सत्तांतर झाल्‍यानंतर अनेक राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलून गेली आहेत. त्‍यातच आता पर्वतीच्‍या भाजप आमदार आणि शिरुर लोकसभा मतदारसंघाच्‍या भारतीय जनता पक्षाच्‍या प्रभारी माधुरी मिसाळ यांनी आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये शिरुर लोकसभा मतदार संघामध्ये भाजपाचाच उमेदवार विजयी होणार असल्‍याचा दावा करत राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. हा मतदार संघ आधीपासून शिवसेनेकडे आहे. येथून सातत्‍याने विजयी होणारे शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील 2019 च्‍या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाले. त्‍यानंतर त्‍यांनी आता शिंदे गटात प्रवेश केला आहे. भाजप आढळरावांना भाजपचे तिकीट देणार की भाजप नवा उमेदवार देणार अशा चर्चांनी राजकीय वातावरण ढवळून निघत आहे.

आमदार मिसाळ म्‍हणाल्‍या की, शिवसेना भाजपा युतीच्या काळात शिरूर लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यांची ताकद असली तरीही आमचे या लोकसभा मतदारसंघात भाजपचे संघटनात्मक काम चालू आहे. पक्ष वाढविण्याचा अधिकार प्रत्येक पक्षाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा सज्ज असून शिरूर लोकसभा मतदारसंघातील खासदार हा भारतीय जनता पार्टीचाच असेल. दीड वर्षे अगोदरच त्याचे नियोजन पक्षाने सुरु केले आहे. त्याचा पहिला भाग म्हणून केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग या तीन दिवस मतदारसंघाच्या दौऱ्यावर असून त्यांच्याकडून आढावा घेतला जाणार असल्याचे आमदार मिसाळ यांनी सांगितले.

केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंग या लोकसभा प्रवास योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदार संघाचा 14, 15 आणि 16 सप्टेंबर असा तीन दिवस दौरा करणार आहेत. त्याची सविस्तर माहिती देण्यासाठी मतदार संघाच्या निवडणूक प्रभारी आमदार माधुरी मिसाळ पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होत्या.

या वेळी संयोजक ऍड. धर्मेंद्र खांडरे, भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, पुणे जिल्हा सहकारी बॅंक संचालक प्रदीप कंद, माजी जिल्हा परिषद सदस्या आशा बुचके, माजी जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे-पाटील, अतुल देशमुख, रोहित उंदरे पाटील, राहुल पाचर्णे आदीसह पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.

आमदार माधुरी मिसाळ म्हणाल्या की, केंद्रीय राज्यमंत्री रेणुका सिंग या मतदारसंघातील प्रश्न समजून घेऊन त्याचा अहवाल केंद्राकडे पाठवून ते सोडविण्यास प्राधान्य देणार आहेत. सध्या शिरूर लोकसभेतील 6 विधानसभा मतदारसंघात दौरा करण्यात आला असून 21 कलमी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यामध्ये शासकीय योजनेचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांचा मेळावा, समविचारी सामाजिक संस्थांशी चर्चा करणे. मंदिर, समाधी स्थळे आदी ठिकाणी भेट देण्यात येणार आहे. शिर्डी, बारामती, शिरूर लोकसभेच्या विजयासाठी भाजपाने आठ जणांची टीम तयार केली असून मतदारसंघ प्रभारी संयोजक प्रत्येकी एक तर विधी विभाग, सोशल मीडिया, केंद्राच्या योजना पोचविणारे प्रत्येकी दोघे असा समावेश असणार आहे.
या मतदारसंघावर केलेय केंद्रित लक्ष

भाजपने आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरु केली असून काही विशिष्ट लोकसभा मतदार संघांवर जास्‍त लक्ष केंद्रित केले आहे. लोकसभा प्रवास योजनेंतर्गत राज्यातील 16 लोकसभा मतदारसंघाचा समावेश करण्यात आला आहे. या मध्ये बुलढाणा – चंद्रपूर, हिंगोली, औरंगाबाद, पालघर, कल्याण, मुंबई दक्षिण, मध्य मुंबई, रायगड, बारामती, शिरूर, शिर्डी, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर , हातकणंगले या मतदार संघांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती आणि शिरूर लोकसभेचा समावेश आहे. बारामती लोकसभेची जबाबदारी आमदार प्रा. राम शिंदे यांच्याकडे देण्यात आली आहे. तर शिरूर लोकसभेची आमदार माधुरी मिसाळ यांच्‍याकडे देण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Back to top button
error: सर्व हक्क सुरक्षित असून कॉपी करू नये