पुण्याच्या गणेशोत्सवानं नेमकं काय साधलं?

-अनिरूद्ध बडवे
पुण्याच्या गणेशोत्सवानं नेमकं काय साधलं? हे पाहत असताना या दहा दिवसांत जे मिळवलं, त्याहीपेक्षा वर्षभरात या उत्सवानं काय दिलं? हे पाहणं जास्त अपरूपतेचं आहे. कारण गणेशोत्सव दहा दिवसांचा सोहळा जरी असला तरी या माध्यमातून राबणारी चळवळ सांगलीच्या पुरापासून ते यवतमाळच्या भुकेल्या पोटापर्यंत एका सामाजिक उत्तरदायित्वाचे यज्ञकुंड पेटवणारी एक चळवळ झाली आहे. गणेशोत्सवाच्या मंडपामध्ये चालणाऱ्या या कोट्यवधी रुपयांच्या सामाजिक
-आर्थिक उदात्तीकरणावर टाकलेला एक वेध !
पुण्याचे गणपती पाहण्याचे आकर्षण हे संपूर्ण महाराष्ट्राला नव्हे, तर देशाला आहे. पुणे फेस्टिव्हलसारख्या माध्यमातून ते आंतरराष्ट्रीयस्तरावर पोहोचले, परंतु केवळ देखावे आकर्षक रोषणाई भव्यदिव्य मिरवणुका गणेश मंडळातील कार्यक्रम याहीपलीकडे जाऊन या गणेशोत्सवांनी नेमके काय दिले, याचे उत्तर पाहिले तर या दहा दिवसांच्या पलीकडेदेखील वर्षभरामध्ये अनेक संकटांना धावून जाणाऱ्या कार्यकर्त्यांची मोठी फौज त्या सामाजिक भावनेची एक मोठी चळवळ या गणेशोत्सवामधून राबवली गेली. केवळ भाऊ रंगारी लोकमान्य टिळक यांच्या काळापुरती ती चळवळ नव्हती, तर ती अधिक व्यापकतेने आजपर्यंत रोजच चाललेली आहे, याचे प्रत्यंतर येते.
दगडूशेठ हलवाई ट्रस्ट
पुण्याच्या दगडूशेठ हलवाई गणपती हे तर अखिल भारताचे आकर्षण. सुनील रासने, महेश सूर्यवंशी, हेमंत रासने, माणिक चव्हाण यांनी या ऐतिहासिक दगडूशेठ गणपती गणेशोत्सव सोहळ्याला नवा आयाम दिला. स्पर्धा परीक्षांच्या लोकांना पुस्तके वह्या वाटण्यापासून ते निःशुल्क रुग्णवाहिका चालविण्यापर्यंत अनेक गोष्टी त्यांनी केल्या कवठ्यावरील लोकांना ऑनलाईनच्या माध्यमातून अथर्वशीर्ष आणि शास्त्रीय पूजनाचे पठण करीत असताना प्रत्यक्ष रस्त्यावरदेखील हजारो महिलांना एकत्रित बसून सामुदायिक अथर्वशीर्षाचा एक महायज्ञ घडवून आणला.
गोडसेंनी मिरवणुकीला दिली शिस्त
प्रतापराव गोडसे यांनी पुण्याच्या मिरवणुकींना शिस्त दिली आणि त्या शिस्तीप्रमाणे हे मंडळ आजही चालत आहे . प्रतापराव गोडसे हे थोर गणपत्य होते… त्यांना खऱ्या अर्थाने गणेशाचा आशीर्वाद होता. त्यांच्या अनेक संकल्पनेने या ट्रस्टचा सामाजिक उत्तरदायित्वाचा महारथ पुढे गेला. पुण्याच्या गणेशोत्सव इतिहासामध्ये त्यांचे नावाचे पान कायमस्वर्णाक्षराने लिहिले जाईल.
भौगोलिक मर्यादा ओलांडून दुर्लक्षकांची सेवा
श्याम मानकर या तरुणांनी यवतमाळच्या लेकरांच्या पोटाची भूक भागवण्याचा प्रयत्न केला. गणेशोत्सवाच्यानिमित्ताने निर्माण होणारी गंगाजळी एकत्रित करून त्यांनी यवतमाळमध्ये तो प्रकल्प राबवला. हजारो लोकांना तिथे अन्न मिळाले, काम मिळाले आणि त्यांच्या कित्येक दिवसांचा रोजगारदेखील मिळाला, म्हणजे पुण्याच्या गणेशोत्सव पुण्याच्या मर्यादा ओलांडून यवतमाळसारख्या ग्रामीण भागामध्ये दुर्लक्षित भागामध्ये जाऊन जेव्हा काम करतो तेव्हा या गणेशोत्सव चळवळीचा विस्तार आणि व्यापकता लक्षात येते. मानकर यांचा हा प्रयत्न पुण्याच्या गणेशोत्सवाच्या संपूर्ण चळवळीचे खऱ्या अर्थाने यश मानले पाहिजे. कदाचित लोकमान्य टिळकांनादेखील याच उदात्तीकरणाचे आणि माणुसकीच्या जागरूकतेची गरज होती.
कष्टकरी महिलांच्या वस्तूंना पैसा देण्याचा प्रयत्न
संगीता तिवारी या तसे पाहिले तर ह्या काँग्रेसच्या कार्यकर्त्या, परंतु प्रदेश महिला काँग्रेस कमिटीमध्ये काम करीत असतानाही त्यांनी शिक्षण मंडळ भारतीय एकता मंच प्रियदर्शनी वुमेन्स फॉर्म या माध्यमातून काम केले. त्यांनी रुजवलेली रोजगाराभिमुख बचत गट योजनाही गणेशोत्सवाच्या माध्यमातून राबविण्यात येणारी एक चळवळच मानली पाहिजे. त्यांना त्यात वैयक्तिक फायदा काहीच मिळत नाही, तरीदेखील गरिबांना प्राधान्य मिळावे. लॉकडाऊनपासून या लोकांची कुत्तरओढ चालू आहे त्यांना कुठेतरी चार पैसे मिळावेत, म्हणून बचत गटाचा एक मोठा वस्तू प्रदर्शनाचा कॅम्प ते भरवतात. लहान-लहान लोकांनी केलेले सामान तेथे आणून ते विकतात. स्वतः अनेक प्रतिष्ठित लोकांना फोन करून तेथे बोलावतात आणि त्याने तेथूनच सामान घ्यावे, यासाठी त्यांना आग्रह करतात. माणुसकीची ही चळवळ संगीता तिवारी यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्व, अपेक्षा त्यांच्या सामाजिक उदात्तीकरणाची उंची वाढविणारी आहे
अनेक योजनांमधून सामाजिक, आर्थिक घडामोडी
निंबाळकर तालीम गणेशोत्सव मंडळ यांनीदेखील अनेक वेळा आपल्या मर्यादेच्या पलीकडे जाऊन काम केले आहे. यंदा त्यांनी पुरोहित लोकांनादेखील मदत केली. मागील दोन वर्षांपासून जे जे संकटात सापडलेल्या प्रत्येकाला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न केला. मागील वर्षीदेखील त्यांनी ही योजना राबवली.
आबा बागुल पुण्याचे आवडते व्यक्तिमत्त्व. त्यांचे पुत्र अमित बागुल यांनी मागील वेळी सांगली पूरग्रस्तांना भरघोस मदत केली. गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुण कार्यकर्ता रस्त्यावर उतरला होता. अमित बागुल हे त्याचे आयडॉल बनले. अमित यांनी सांगलीतील पूरग्रस्तांकरिता ट्रकच्या ट्रक भरून सामान पाठवले. गणेशोत्सव मंडळांच्याच नावाखाली त्यांनी कार्यकर्त्यांची फौज एकत्रित केली आणि हा हे सर्व सामान एकत्रित केले. यंदादेखील अनेक नवनवीन आणि सृजनशील कार्यक्रमांतून त्यांनी गणेशोत्सव राबवला. शिस्तबद्ध मिरवणुका आणि सतत नावीन्य संदेश देण्याचा प्रयत्न हा त्यांच्या गणेशोत्सव मंडळाची खासीयत आहे.
दहा हजार लोकांना जेवण देणारा ख्रिश्चन गणेशभक्त
लसीकरणामध्ये मोठा वेग घेतला होता. मागील वेळी जर ही काही मंडळी नसली असती तर पुण्यातील एवढ्या मोठ्या आरोग्य केंद्राला कोण सांभाळणार, हा खरा तर प्रश्न पडला होता. येरवडा भागामध्ये एक जॉन पोल नावाचे गृहस्थ आहेत. तब्बल दहा हजार लोकांना ते जेवण देत असत. अतिशय लहान मूर्ती मिरवणुकीचा खर्च नाही. साधेपणाने गणेशोत्सव साजरा करीत असतानादेखील दररोज पंगती मात्र कामगार आणि कष्टकऱ्यांच्या उठत होत्या. ख्रिश्चन समाजाचा हा माणूस येरवडा भागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून हे काम करतो. गणेशोत्सवाच्यानिमित्ताने साधणारेही सामाजिक उदात्तीकरण नाही काय.
स्पर्धा व्याख्यानांमधून बौद्धिक ज्ञानयोग
पुणे फेस्टिव्हल कोथरूड महोत्सव गणेशोत्सव बौद्धिक, जनता बँक कार्यशाळा अशांसहित झोन वन म्हणजे पुण्याच्या मध्यवर्ती भागातील अनेक सोसायट्यांमधूनदेखील गणेशोत्सव साजरा होतो. तो प्रामुख्याने स्पर्धा, व्याख्याने, कार्यशाळा, संगीत मेजवानी अशा धरतीवर होतो. कर्वे रोडमध्ये स्वप्निलसारख्या सोसायटीमध्ये सात दिवसांचा गणेशोत्सव भरतो आणि सोसायटीमधील कलाकार त्यामध्ये सहभागी घेऊन रोज चार ते साडेचार तासांचा कार्यक्रम करतात. सावरकर भवन पिंपरी चिंचवडमधील सभागृह यशवंतराव चव्हाण सभागृह कोथरूड, बालगंधर्व, आपटे सभागृह नाही. या सर्व ठिकाणी गणेशोत्सवांमध्ये प्रचंड रिसेल होती. या सर्व कार्यक्रमांमधून गणेश उत्सव एक निमित्त जरी असले तरी सामाजिक उदात्तीकरणाचा फार मोठा वसा यानिमित्ताने पुढे नेला जातो
पुणे फेस्टिव्हलचे पुनर्वैभव
पुण्याच्या गणेशोत्सवाच्या बरोबरीने एकेकाळी पुणे फेस्टिव्हल हा चर्चेचा, सन्मानाचा आणि चर्चेचा विषय होता. गेल्या दोन वर्षांपासून त्याला थोडा ब्रेक लागला. त्याहीपूर्वी सुरेश कलमाडी यांच्या आजारपणापासूनच खरं तर याला ओहोटी लागली, परंतु इतक्या वर्षांनंतर कृष्णकुमार गोयल यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दिमाखदार पुणे फेस्टिव्हल करण्याचा प्रयत्न झाला. कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली. खासदार हेमामालिनी यांच्यासह अनेक अभिनेत्री-अभिनेते नितीन गडकरी, फडणवीस यांच्यासारखे नेते या व्यासपीठावर आले, परंतु स्थानिक कलाकारांनादेखील मोठ्या प्रमाणामध्ये स्थान दिले गेले. पहिल्यांदाच या वेळेस तब्बल ४४ कार्यक्रम पुणे फेस्टिव्हलच्या माध्यमातून पार पडले. सहा ठिकाणी वेगवेगळ्या व्यासपीठांवर हे कार्यक्रम होत होते. सुनील महाजन, सचिन ईटकर यांच्या माध्यमातून झालेला कोथरूड महोत्सव हादेखील पहिलाच प्रयोग असला तरी खूप चांगल्या पद्धतीने तो पार पडला. त्यानिमित्ताने लहान-लहान महोत्सवांमधून पुण्याच्या कलाकारांना आणि अभिव्यक्तीला स्वतंत्र व्यासपीठ मिळत चालले आहे.
कम्युनिटी पोलिसिंगवर भर
यंदाच्या गणेशोत्सवामध्ये उड्डाणपूल, त्याची उंची, वाहतुकीसाठीचे अडथळे, लहान रस्ते याचा अडचणी झाल्या, परंतु वाहतूक संचलनामध्ये कार्यकर्त्यांनादेखील एकत्रित करावे, ही एक नवीन गरज ज्यावेळेस निर्माण झाली. कम्युनिटी पोलिसांच्या माध्यमातून पोलीस व्यवस्थापन आणि वाहतूक पोलिसांनी गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांना जर पोलिसांच्या नियमांमध्ये एकत्रित केले तर अधिकांश आणि त्याचा उपयोग होऊ शकेल. बऱ्याच ठिकाणी कार्यकर्तेच वाहतूक नियमांचे काम करीत असतात, तर पोलिसांनी त्यांची अधिकृत मदत घेतली आणि असा काही दल तयार केला, तर मिरवणुका आणि एकूणच गणेशोत्सवाचे संचलन होण्यास मदत होणार आहे.
गणेशोत्सव भव्य-दिव्य कसा व्हावा
पुण्याच्या गणपतीची सुरुवातच मानाच्या पाच गणपतींनी होते. त्यात हिंदुस्थानातील सर्वात पहिला सार्वजनिक गणपती म्हणून भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळाचे नाव घेतले जाते… परंतु या मंडळाचे प्रमुख विश्वस्त आणि त्यांचे ब्रँड मोठ्या प्रमाणात दिसले, त्या पुनीत बालन यांचादेखील या गणेशोत्सवात मोठा गवगवा झाला. खरंतर भाऊसाहेब रंगारी गणेशोत्सव मंडळ हा सर्वात पहिला आणि मानाचा गणपती. कारण गणेशोत्सवाची सुरुवातच तिथून झाली, परंतु ती भव्यदिव्यता आणि त्याच्या अर्थकारणासाठी लागणारे कसब, हे प्रत्येक परंपरेच्या पाठीमागे असतेच असे नाही, परंतु पुनीत बालन यांनी त्याला एक आयाम दिला . गणेशोत्सव, दहीहंडी या मराठी अस्मिता जागवणाऱ्या सोहळ्यांमध्ये पुनीत बालन – माणिकचंद ग्रुपने मोठ्या प्रमाणात पुढाकार घेतला. केवळ त्यांच्या मर्यादित मंडळांपुरते नाहीत, तर ज्या मंडळाने त्यांच्या दरवाजावर दस्तक दिली, त्यांना देणगी देऊन गणेशोत्सव भव्य-दिव्य कसा व्हावा, हा प्रयत्न बालन यांनी वैयक्तिकरीत्या केला. त्यांनी पुण्यातील गणेशोत्सव मंडळांना लाखो रुपयांच्या देण्यात वाटल्याचे समजते. पुणेकरांनादेखील तेच ते राजकारण्यांचे मोठमोठे चेहरे घेऊन राजकीय अभिनिवेश दाखवणाऱ्या दादा – तात्या – भाऊ- नेत्यांपेक्षा किंवा गळ्यात हातात सोनकड्या घालून भेसूर पोस्टरबाजी करणाऱ्या तथाकथित कार्यकर्त्यांपेक्षा हे कॉर्पोरेट ब्रँडिंग सुखावह वाटले.